‘माझा ब्रिटनचा प्रवास’ विषयावरील व्याख्यानात ब्रिटनच्या शिक्षणव्यवस्था व संसदीय परंपरेचे अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले
भुसावळ | जगदीश सपकाळे । प्रतिनिधी
“आधुनिक जगाचा अभ्यास केल्यावर हे स्पष्ट होते की कोणत्याही देशाचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास हा त्या देशातील शिक्षण व्यवस्थेतील ज्ञान, शिस्त आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर अवलंबून असतो. ज्ञान व शिस्तीच्या भक्कम पायावरच समाज आणि राष्ट्राची खरी प्रगती घडते,” असे प्रतिपादन भालोद येथील कला व विज्ञान महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी केले.
महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे आयोजित ‘माझा ब्रिटनचा प्रवास’ या विषयावरील व्याख्यान आणि सत्कार समारंभात ते बोलत होते. नुकतेच ब्रिटनचा संसदीय अभ्यास दौरा करून परतलेल्या प्रा. नेवे यांनी तेथील शिक्षण व्यवस्था, संसदीय लोकशाही आणि सामाजिक शिस्तीचे अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सौ. हेमलताताई इंगळे होत्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. कोल्हे, मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. जतीन मेढे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रा. नेवे म्हणाले की, ब्रिटनमधील विद्यापीठे ही केवळ पदवी प्रदान करणाऱ्या संस्था नसून ज्ञान, संशोधन आणि व्यक्तिमत्त्व विकासाची केंद्रे आहेत. आधुनिक सुविधांनी सुसज्ज ग्रंथालये, संशोधनाला पूरक वातावरण आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वअभ्यासाची संस्कृती यामुळे तेथील नागरिकांमध्ये ज्ञान, शिस्त आणि विनम्रता या मूल्यांची जपणूक होते. रेल्वे, भूमिगत वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुविधा या सर्व ज्ञान व विज्ञानाच्या बळावर उभ्या राहिलेल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथील भेटीचा अनुभवही कथन केला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलेल्या या जागतिक कीर्तीच्या संस्थेतील ग्रंथालयात बाबासाहेबांची प्रतिमा पाहून प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावते, असे ते म्हणाले. जगाने बाबासाहेबांचे ज्ञान आणि विद्वत्ता ओळखली असली तरी आपण त्यांचे विचार अधिक व्यापकपणे आत्मसात करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
“ज्ञानाने समृद्ध झाल्याशिवाय समाज आणि देशाची शाश्वत प्रगती शक्य नाही. त्यामुळे प्रत्येकाने ज्ञानार्जनाची वृत्ती जोपासून आयुष्यभर विद्यार्थी राहावे,” असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.
या कार्यक्रमास प्रा. डॉ. अजय कोल्हे, डॉ. मुकेश पवार, डॉ. आशुतोष वर्डीकर, प्रा. डॉ. मीनाक्षी वाघुळे, प्रा. मोहिनी तायडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. दिनेश पाटील यांनी केले.
