भारत विकास परिषदेसह विविध संस्थांचा संयुक्त उपक्रम; सुमारे १७० नागरिकांनी घेतला लाभ
कल्याणे होळ (ता. धरणगाव) | प्रतिनिधी
समाजहिताची भावना जपत भारत विकास परिषद, जळगाव शाखा, श्री चामुंडा माता होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय, पी. ई. तात्या पाटील रुग्णालय आणि इंडियन डेंटल असोसिएशन, जळगाव शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याणे होळ येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत महाआरोग्य तपासणी शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात सुमारे १७० नागरिकांनी सहभाग नोंदवत विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला.
शिबिराच्या आयोजनासाठी पोलीस पाटील दीपक पाटील यांनी पुढाकार घेत विविध संस्था, वैद्यकीय तज्ज्ञ आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्यात प्रभावी समन्वय साधला. त्यामुळे दर्जेदार आरोग्यसेवा ग्रामीण भागातील नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविण्यात यश आले.
शिबिरामध्ये जनरल तपासणी, स्त्रीरोग, बालरोग, दंत तपासणी, सांध्यांचे आजार, फिजिओथेरपी तसेच आयुर्वेदिक मार्गदर्शन अशा विविध वैद्यकीय सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच रणजीत पाटील, उपसरपंच विठ्ठल पाटील, ग्रुप ग्रामपंचायत कल्याणे होळचे सदस्य, निसर्ग सावली फाउंडेशन, नोबेल फाउंडेशनचे मार्गदर्शक जयदीप पाटील, राजाराम दादा स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी सरपंच रमेश राजाराम पाटील तसेच ग्रामस्थ, स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी पोलीस पाटील दीपक पाटील यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, स्मृतिदिन किंवा इतर कोणत्याही निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची इच्छा असल्यास इच्छुकांनी संपर्क साधावा. वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, शैक्षणिक साहित्य वाटप, स्वच्छता अभियान, पुस्तक वाटप यांसारखे लोकहिताचे उपक्रम गावात राबविण्यासाठी आवश्यक समन्वय व सहकार्य करण्यात येईल.
ग्रामीण भागात आरोग्यसेवा आणि समाजसेवेची चळवळ अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रेरणादायी ठरला असून, भविष्यातही अशा उपक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
