केकऐवजी समाजसेवेची परंपरा; श्री साकेश्वर विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात
जामखेड | प्रतिनिधी – बापुसाहेब घोडेस्वार
जामखेड तालुक्यातील ल. ना. होशिंग माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक सुदाम वराट यांनी वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत आदर्श उपक्रम राबविला. त्यांनी श्री साकेश्वर विद्यालय, साकत येथील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेशाचे वाटप करून समाजापुढे प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले.
सुदाम वराट यांनी तब्बल २८ वर्षे श्री साकेश्वर विद्यालय, साकत येथे सहशिक्षक म्हणून प्रामाणिक सेवा बजावली आहे. नुकतीच त्यांची ल. ना. होशिंग माध्यमिक विद्यालय, जामखेड येथे पर्यवेक्षकपदी पदोन्नती झाली आहे.
दरवर्षी वाढदिवस केक कापून साजरा करण्याऐवजी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात देण्याची परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे. यंदाही त्यांनी विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, लेखन साहित्य आणि शालेय गणवेशांचे वाटप केले. “शिक्षणासाठी कोणतेही मूल मागे राहू नये,” हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी मनापासून स्वागत केले.
यावेळी श्री साकेश्वर विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या पुढाकारातून इयत्ता पाचवीतील सर्व विद्यार्थ्यांनाही शालेय गणवेशांचे वितरण करण्यात आले. वाढदिवसानिमित्त तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी आणि पत्रकार बांधवांनी सुदाम वराट यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
कार्यक्रमाला उपसरपंच राजाभाऊ वराट, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्रीराम मुरूमकर, पोलीस पाटील महादेव वराट, मुख्याध्यापक भरत लहाने, अर्जुन रासकर, त्रिंबक लोळगे, सुलभा लवुळ, सचिन वराट, मुकुंद वराट, प्रसाद होशिंग, लहाने मॅडम, अतुल दळवी, आण्णा विटकर, सरोदे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट : “वाढदिवस साजरा करायचा तर असा!”
सुदाम वराट यांच्या या सामाजिक उपक्रमातून “वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजाला काहीतरी देण्याची संधी आहे,” हा सकारात्मक संदेश तालुकाभर पोहोचला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून अनेकांसाठी तो प्रेरणादायी ठरत आहे.
