१५ ऑगस्ट रोजी होणार लोकार्पण; रुग्णांना दिलासा, काँग्रेस नेते अमीन पटेल यांच्या पाठपुराव्याला यश
सुनील निकम धुळे | प्रतिनिधी
धुळे जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक एमआरआय (MRI) मशीन उपलब्ध झाल्याने जिल्ह्यातील तसेच परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. या सुविधेचे लोकार्पण येत्या १५ ऑगस्ट रोजी होणार असून, अनेक वर्षांपासून या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ माजी नगरसेवक तथा समाजसेवक अमीन पटेल यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे सांगितले जात आहे.
अमीन पटेल हे गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या गरजू रुग्णांना उपचार, मार्गदर्शन आणि विविध शासकीय आरोग्य सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. जिल्हा रुग्णालयात एमआरआय मशीन उपलब्ध व्हावी, यासाठी त्यांनी आंदोलने, निवेदने, जिल्हा प्रशासन व रुग्णालय प्रशासनाशी पाठपुरावा तसेच संबंधित मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन सातत्याने मागणी लावून धरली होती.

या प्रयत्नांनंतर जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक एमआरआय मशीन उपलब्ध झाली असून, आता जिल्ह्यातील रुग्णांना एमआरआय तपासणीसाठी इतर शहरांमध्ये जाण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. यामुळे वेळ, खर्च आणि उपचारासाठी होणारा विलंबही कमी होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, अमीन पटेल यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी सोनवणे यांच्या समवेत नव्याने बसविण्यात आलेल्या एमआरआय मशीनची पाहणी केली. यावेळी मशीनच्या कार्यपद्धतीची माहिती घेण्यात आली तसेच रुग्णांना ही सेवा अधिक प्रभावी आणि वेळेत उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. याच वेळी एमआरआय मशीनचे लोकार्पण १५ ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आली.
या पाहणीवेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष भाई नगराळे, सेवा दलाचे शहराध्यक्ष राजेंद्र खैरनार, धुळे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा भावना गिरासे, अब्दुल हक, नवीन अख्तर, सुफिक अहमद, अबुलास खान, आसिफ अन्सारी, रईस अहमद, मुजाहिद हुसेन, आसिफ भाई, वकील अहमद, कुरबान अन्सारी आदी उपस्थित होते.
एमआरआय मशीन सुरू झाल्यानंतर धुळे जिल्ह्यासह परिसरातील हजारो रुग्णांना जिल्हा रुग्णालयातच आधुनिक निदान सेवा उपलब्ध होणार असून, आरोग्य सेवेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
