१३,४०२ संस्थात्मक प्रसूती, ४,०६१ महिला नसबंदी शस्त्रक्रिया; माता-बाल आरोग्य सेवेत जिल्ह्याची लक्षणीय प्रगती
सुनील निकम धुळे | प्रतिनिधी
“नियोजित कुटुंब – निरोगी कुटुंब, सुदृढ समाज” या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवत धुळे जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांनी कुटुंब नियोजन आणि माता-बाल आरोग्य सेवांमध्ये उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी नियोजन, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि समन्वयामुळे जिल्ह्यात कुटुंब नियोजन सेवांना मोठी गती मिळाली आहे.
जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये १३,४०२ सुरक्षित संस्थात्मक प्रसूती करण्यात आल्या. तसेच ४,०६१ महिला नसबंदी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या, तर २८ पुरुषांनी पुरुष नसबंदी (NSV) करून लोकसंख्या स्थिरीकरणासाठी योगदान दिले.
प्रसूतीनंतर सुरक्षित गर्भनिरोधक सेवांचा प्रसार करण्यासाठी ३,१२५ महिलांनी PPIUCD सेवेचा लाभ घेतला, जे एकूण प्रसूतींपैकी सुमारे २३ टक्के आहे. दोन अपत्यांमध्ये योग्य अंतर राखण्यासाठी २३७ महिलांना ‘अंतरा’ गर्भनिरोधक इंजेक्शन देण्यात आले, तर तात्पुरत्या गर्भनिरोधक साधनांचा वापर वाढावा यासाठी १,९५४ ‘छाया’ (सेंटक्रोमन) गोळ्यांच्या पट्ट्यांचे वितरण करण्यात आले.
याशिवाय ३६,६११ गर्भधारणा चाचणी किट (Pregnancy Test Kit) वापरून महिलांना वेळेत गर्भधारणेचे निदान आणि आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.
आरोग्य विभागाच्या मते, ही कामगिरी केवळ आकडेवारी नसून नागरिकांमध्ये कुटुंब नियोजनाबाबत वाढलेली जागरूकता, शासकीय आरोग्य सेवांवरील विश्वास आणि आरोग्य यंत्रणेच्या समर्पित कार्याचे प्रतीक आहे. आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी तळागाळात जाऊन केलेल्या जनजागृती व समुपदेशनामुळे हे यश शक्य झाले आहे.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे यांनी कुटुंब नियोजन हा निरोगी समाजाचा पाया असल्याचे सांगत प्रत्येक पात्र दांपत्याने शासनामार्फत मोफत उपलब्ध असलेल्या कुटुंब नियोजन सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. भविष्यातही गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा प्रत्येक नागरिकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, बाह्य संपर्क अधिकारी डॉ. विवेक जाधव, प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत चौधरी, अधिसेविका शोभा पवार, ओपीडी इन्चार्ज घोडके सिस्टर तसेच जिल्हा व स्त्री रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी आणि परिचारिका उपस्थित होत्या.
