अजमेरहून नाशिककडे परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात; पाच जण गंभीर जखमी, पोलिसांचे तातडीने मदतकार्य
सुनील निकम धुळे | शिरपूर प्रतिनिधी
राजस्थानातील अजमेर येथे देवदर्शन करून नाशिककडे परतणाऱ्या भाविकांच्या इनोव्हा कारला शिरपूरजवळ भीषण अपघात झाला. भरधाव इनोव्हा कारने महामार्गावरील कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच शिरपूर पोलीस, महामार्ग वाहतूक पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तत्काळ बाहेर काढून उपचारासाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, नाशिक येथील भाविक अजमेर येथील देवदर्शन करून इनोव्हा (एमएच-05 सीव्ही-1001) या वाहनातून परतत होते. शिरपूरजवळ महामार्गावर पुढे असलेल्या कंटेनरला कारने मागून जोरदार धडक दिल्याने वाहनाचा समोरील भाग पूर्णपणे चुराडा झाला.
या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय अधिकारी लक्ष ठेवून आहेत.
या घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.
