सावधान! ज्ञानदेव नगर परिसरातील रस्त्याची दुर्दशा; खड्ड्यांमुळे नागरिक व वाहनधारक हैराण 2026
जुना नशिराबाद रोडवरील १०० फूट रोडलगतच्या मार्गाची चाळण; तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी
जळगाव | प्रतिनिधी
जुना नशिराबाद रोडवरील १०० फूट रोडलगत असलेल्या ज्ञानदेव नगरकडे जाणाऱ्या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
सततच्या पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांच्या खोलीचा अंदाज येत नसून, अपघातांचा धोका वाढला आहे. रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णपणे उखडल्याने संपूर्ण मार्गाची चाळण झाली आहे.
अपघातांचा वाढता धोका
या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे द्विचाकीस्वार वारंवार घसरून पडत असल्याच्या घटना घडत आहेत. रात्रीच्या वेळी अपुऱ्या प्रकाशामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनत असून अपघाताचा धोका दुप्पट झाला आहे. तसेच पादचाऱ्यांना चिखल आणि साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागत असल्याने मोठी गैरसोय होत आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात नागरिकांमध्ये नाराजी
ज्ञानदेव नगरकडे जाणाऱ्या या मार्गावरून दररोज शेकडो नागरिक, शाळकरी विद्यार्थी आणि वाहनधारकांची ये-जा असते. मात्र, रस्त्याची एवढी दयनीय अवस्था होऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दखल घेऊन खड्डे बुजवावेत आणि संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती करावी, जेणेकरून भविष्यात होणारे अपघात टाळता येतील, अशी मागणी केली आहे.
