चार महिने उलटले तरी अंधारात! कासारखेड्यात ट्रान्सफॉर्मर बसवला, पण वीज वाहिनी अजूनही ‘लटकलेली’
मुख्य वीज लाईन न जोडल्याने ग्रामस्थ हैराण; ‘आधी वीजपुरवठा सुरळीत करा, मगच स्मार्ट मीटर बसवा’ – ग्रामस्थांचा संतप्त सवाल
हर्षदीप कासारखेडा (ता. यावल, जि. जळगाव) | प्रतिनिधी
गावात सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी महावितरण कंपनीने नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करून तो बसवला. मात्र, तब्बल चार महिने उलटूनही या ट्रान्सफॉर्मरला मुख्य वीज वाहिनी जोडण्यात आलेली नसल्याने कासारखेडा येथील ग्रामस्थांना आजही अपुऱ्या वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे.
महावितरणच्या कथित दिरंगाईमुळे गावातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, ओव्हरलोड झालेल्या जुन्या ट्रान्सफॉर्मरवरच संपूर्ण गावाचा भार असल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होणे आणि ट्रान्सफॉर्मर ट्रिप होण्याच्या समस्या कायम आहेत.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, चार महिन्यांपूर्वी नवीन ट्रान्सफॉर्मर उभारण्यात आला. त्यासाठी मुख्य वीज लाईनचे खांबही उभारण्यात आले आहेत. मात्र, अद्याप त्या खांबांवर मुख्य वीज वाहिनी जोडण्यात आलेली नसल्याने ट्रान्सफॉर्मर सुरूच करण्यात आलेला नाही.
‘आधी वीजपुरवठा सुरळीत करा, मगच स्मार्ट मीटर बसवा’
एकीकडे गावात मुख्य वीज वाहिनीचे काम महिनोनमहिने रखडलेले असताना, दुसरीकडे स्मार्ट मीटर बसविण्याची घाई सुरू असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
“महावितरणने आधी गावातील वीजपुरवठा पूर्णपणे सुरळीत करावा, नवीन ट्रान्सफॉर्मरला मुख्य लाईन जोडून तो कार्यान्वित करावा आणि त्यानंतरच स्मार्ट मीटर बसवावेत,” अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांना फटका
या समस्येमुळे रात्रीच्या वेळी वीज नसणे किंवा कमी दाबाने वीजपुरवठा होणे, याचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. उकाडा आणि पावसाळ्यात ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विजेअभावी घरातील आवश्यक उपकरणेही बंद राहत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे.
आंदोलनाचा इशारा
संबंधित कंत्राटदार आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच हे काम रखडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “फक्त खांब गाडून आणि ट्रान्सफॉर्मर उभा करून तो शोभेची वस्तू बनवली आहे का?” असा सवाल उपस्थित करत, महावितरणने तातडीने मुख्य वीज वाहिनी जोडून ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित न केल्यास यावल येथील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
