दिल्लीतील विद्यार्थी-युवा आंदोलनावरील कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ समता सैनिक दलाचे आंदोलन
राष्ट्रपतींना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन; न्यायालयीन चौकशीसह विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर निर्णयाची मागणी
जळगाव | प्रतिनिधी
दिल्लीतील विद्यार्थी-युवा आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ समता सैनिक दल, महाराष्ट्र राज्याच्या वतीने जळगाव येथे आंदोलन करण्यात आले. राज्य संघटक विजय निकम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनानंतर भारताच्या राष्ट्रपतींना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी विजय निकम यांनी भारतीय संविधानाने नागरिकांना शांततापूर्ण आंदोलन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दिला असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांच्या कथित दमनाऐवजी शासनाने संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडली.
समता सैनिक दलाने सादर केलेल्या निवेदनात दिल्लीतील घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली निष्पक्ष व कालबद्ध चौकशी, दोषींवर कठोर कारवाई, जखमी विद्यार्थी-युवांना आर्थिक मदत व उपचार, आंदोलनकर्त्यांवरील कथित गुन्ह्यांचे पुनरावलोकन, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय तसेच शांततापूर्ण आंदोलनाच्या संविधानिक अधिकाराचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, चौकशीत जबाबदारी निश्चित झाल्यास केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
विजय निकम यांनी केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक भूमिका न घेतल्यास समता सैनिक दल राज्यभर लोकशाही मार्गाने व्यापक जनआंदोलन उभारेल, असा इशाराही दिला.
आंदोलनादरम्यान “जय भीम”, “जय संविधान”, “लोकशाही वाचवा – संविधान वाचवा”, “विद्यार्थ्यांवरील अन्याय बंद करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या आंदोलनात गौतम सोनवणे, मुकुंदा भालेराव, अनिताताई कापुरे, श्याम उपाध्याय, सतीश अडकमोल, विनोद अडाळके, सुधीर शिरसाट, संगीता शिरसाट, सुमित्रा आहिरे, भीमराव निकम, रंजना शिरसाट, भारती शिरसाट, अश्विनी जंजाळे, सुनिता सूर्यवंशी, आनंदा सोनवणे यांच्यासह समता सैनिक दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी-युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
