इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी येथे आषाढी एकादशी भक्तीमय वातावरणात साजरी
विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या वेशभूषेत सादर केला वारकरी संस्कृतीचा देखणा आविष्कार
पाळधी | प्रतिनिधी
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी येथे शुक्रवार (दि. २४ जुलै) रोजी आषाढी एकादशीचा पवित्र उत्सव अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचे दर्शन घडवित विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम तसेच वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी होत कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे चेअरमन इंजि. नरेश चौधरी यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर प्री-प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांनी विठ्ठल नृत्य, अभंग, भजन, हरिपाठ आणि विठ्ठल नामस्मरण सादर करून उपस्थितांना भक्तिरसात रंगवले. “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने संपूर्ण शाळा परिसर भक्तिमय झाला.
यावेळी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व समजावून सांगण्यात आले. संतांच्या विचारांप्रमाणे सत्य, सदाचार, सेवा, समता आणि भक्ती ही जीवनमूल्ये अंगीकारण्याचा संदेशही देण्यात आला.
कार्यक्रमाला आबासो. रवींद्र चौधरी, संचालक विजय चौधरी, आर. बी. पाटील, विभावरीताई पाटील, जी. डी. पाटील, प्राचार्य आर. एल. माळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे भारतीय संस्कृतीबद्दल आदर, नैतिक मूल्ये आणि सामाजिक जाणीव विकसित होत असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाची अनुभवात्मक ओळख झाली.
