पारोळा कुटीर रुग्णालयातील विविध समस्यांबाबत वंचित बहुजन आघाडीचे निवेदन
अस्थिरोग तज्ज्ञाची नियुक्ती, मानसिक आरोग्य सेवा, एक्स-रे सुविधा व कर्मचारी व्यवस्थापन सुधारण्याची मागणी
पारोळा | सुरेश पाटोळे प्रतिनिधी
पारोळा येथील कुटीर रुग्णालयातील आरोग्य सेवा सुधाराव्यात आणि रुग्णांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे तातडीने निराकरण करावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले. हे निवेदन डॉ. साळुंखे यांना सादर करण्यात आले.
निवेदनात रुग्णालयात कायमस्वरूपी अस्थिरोग तज्ज्ञाची नियुक्ती करणे, मानसिक आरोग्य विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती नियमित ठेवणे, सफाई कर्मचाऱ्यांना आवश्यक स्वच्छता साहित्य उपलब्ध करून देणे, सर्व रुग्णांना एक्स-रे प्रिंट देण्याची सुविधा सुरू करणे, ऑनलाइन केसपेपर प्रिंट सेवा पुन्हा सुरू करणे तसेच कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त कामाचा ताण कमी करण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय रुग्णालयाच्या कामकाजात कोणत्याही बाह्य व्यक्तीचा अनधिकृत हस्तक्षेप थांबविण्याचीही मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने पारोळा कुटीर रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांची संख्या मोठी असते. मात्र अस्थिरोग तज्ज्ञ उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णांना धुळे किंवा जळगाव येथे रेफर करावे लागते. मानसिक आरोग्य सेवा, स्वच्छता, एक्स-रे सुविधा आणि कर्मचारी व्यवस्थापनातील त्रुटींमुळे रुग्णांना गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.
संबंधित मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी तालुकाध्यक्ष दयाराम मोरे, सहसचिव राजेंद्र कांबळे, महासचिव श्रीकांत सोनवणे, शहराध्यक्ष कमलेश सोनवणे तसेच प्रसिद्धी प्रमुख राहुल सरदार उपस्थित होते.
