सारोळा शाळेच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा गौरव
इयत्ता चौथी व सातवीतील २० विद्यार्थ्यांचा सत्कार; सरपंच अजयदादा काशिद यांच्याकडून विद्यार्थ्यांचे कौतुक
अहिल्यानगर | प्रतिनिधी : बापुसाहेब घोडेस्वार
जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सारोळा (केंद्र-राजुरी) येथे सन २०२६ च्या इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. आदर्श सारोळा गावचे सरपंच अजयदादा काशिद आणि राजुरी केंद्राचे केंद्रप्रमुख माजीद शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
यंदा शाळेतील इयत्ता चौथीतील ७ आणि इयत्ता सातवीतील १३ अशा एकूण २० विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करून शाळेच्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली. प्रथमच नव्या पद्धतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कमी कालावधी मिळूनही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांसह त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या इयत्ता चौथीच्या वर्गशिक्षिका वृषाली खांदवे, इयत्ता सातवीचे वर्गशिक्षक सुरेश बर्वे आणि केंद्रप्रमुख माजीद शेख यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना सरपंच अजयदादा काशिद यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत, “शिक्षणाच्या बळावरच उज्ज्वल भविष्य घडते. विद्यार्थ्यांनी यशाची ही परंपरा कायम ठेवावी,” असे सांगत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ, मुख्याध्यापक संदीप भालसिंग, शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
ठळक बाबी
-
इयत्ता चौथीतील ७ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र.
-
इयत्ता सातवीतील १३ विद्यार्थ्यांचे यश.
-
गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार.
-
सरपंच अजयदादा काशिद यांच्याकडून विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन.
