पाणीपातळी, जलसाठा व सुरक्षाविषयक उपाययोजनांचा घेतला आढावा; संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी समन्वयाने काम करण्याच्या सूचना
एरंडोल | प्रतिनिधी
जळगाव जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारी (दि. ३१ जुलै) एरंडोल तालुक्यातील अंजनी धरणाला भेट देऊन धरणातील पाणीपातळी, उपलब्ध जलसाठा तसेच धरणाच्या सुरक्षिततेसंदर्भातील विविध तांत्रिक बाबींची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडून धरणाची सद्यस्थिती, पाण्याची आवक, जलसाठ्याची स्थिती तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली.
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर कोणतीही संभाव्य परिस्थिती उद्भवल्यास त्याचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी पूर्ण सज्ज राहावे, परस्पर समन्वय राखून काम करावे आणि आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
तसेच धरण परिसरातील सुरक्षाव्यवस्था, पाणीपातळीवरील सातत्याने देखरेख, आवश्यक यंत्रसामग्रीची उपलब्धता आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
मान्सून काळात नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
