अण्णा नगरच्या ‘भक्ती शक्ती गुरुकुल’ मध्ये उत्साहात साजरी झाली गुरुपौर्णिमा
शस्त्र आणि शास्त्र शिक्षणाचा घेतला जात आहे वसा
अण्णा नगर नशिराबाद (प्रतिनिधी):
प्राचीन गुरुकुल परंपरा आणि शिवकालीन युद्धकलेचा वारसा आजही जतन करण्याचे काम अण्णा नगर येथील *’भक्ती शक्ती शिवकालीन युद्ध कला गुरुकुलम’* यांच्या माध्यमातून अविरत सुरू आहे. नुकताच या गुरुकुलमध्ये *गुरुपौर्णिमा उत्सव* अत्यंत उत्साहात, चैतन्यमय वातावरणात आणि शिस्तीचे पालन करत पार पडला.
*गुरुपूजन आणि परंपरांचा सन्मान*
कार्यक्रमाची सुरुवात अतिशय भारावलेल्या वातावरणात झाली. सर्वप्रथम हिंदवी स्वराज्य संस्थापक *छत्रपती श्री शिवाजी महाराज* आणि *धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज* यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर राष्ट्रकार्याचा व धर्ममार्गाचा निस्वार्थ वसा जोपासत असलेल्या मार्गदर्शकांचे स्मरण करून, उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या आई-वडिलांचे पूजन केले. त्यानंतर भक्ती शक्ती गुरुकुलचे प्रमुख तथा शस्त्रकलेचे *गुरुवर्य आशिषजी खैरे* यांचे उपस्थित पालकांच्या हस्ते व विद्यार्थ्यांमार्फत गुरुपूजन करण्यात आले.
*शस्त्र आणि शास्त्राचे धडे*
भक्ती शक्ती गुरुकुलमध्ये केवळ युद्धकला नसून मुलांना संस्कार, शौर्य आणि राष्ट्रभक्तीचे धडे दिले जातात. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी रचलेल्या धर्ममार्गावर चालत देव, देश व धर्माचे कार्य करणे हाच या गुरुकुलचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दुर्गराज श्रीमंत रायगड विभाग, ऐतिहासिक चित्रपट फाईट मास्टर राष्ट्रवीर संघ आणि भक्ती शक्ती गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा पार पडला.
*विद्यार्थ्यांचा सहभाग व शिस्त*
या विशेष उत्सवाला गुरुकुलमधील सर्व मुले आणि मुली आपल्या पालकांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलींनी पूर्ण गणवेशात उपस्थित राहून उत्कृष्ट अनुशासन दाखवले, तर मुलांनीही आपला पूर्ण गणवेश आणि आवश्यक प्रात्यक्षिकांचे साहित्य सोबत आणत कौतुकास्पद सहभाग नोंदवला. वेळेचे काटेकोर पालन, शिस्त आणि संघभावना जपत पार पडलेल्या या उत्सवाने उपस्थांची मने जिंकली.
*”शिवकालीन युद्धकलेचा वारसा जपूया, शौर्य आणि संस्कारांची परंपरा पुढे नेऊया!”* हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गुरुकुलच्या सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
