जे. जे. रुग्णालयात राष्ट्रीय अस्थी व सांधे आरोग्य दिन उत्साहात; सायक्लोथॉनद्वारे आरोग्य जनजागृती
नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि सक्रिय जीवनशैलीचा दिला संदेश; रुग्णसेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांचा गौरव
मुंबई | प्रतिनिधी
राष्ट्रीय अस्थी व सांधे आरोग्य दिनानिमित्त सर जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोग विभागात विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करून हा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. अस्थी व सांधे निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि सक्रिय जीवनशैलीचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित कार्यक्रमाला डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
अस्थिरोग विभागाचे विभागप्रमुख डॉ. नादिर झेड. शाह यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांच्या हस्ते झाले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरसे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. रणजित माणकेश्वर, न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. व्हर्नन वेल्हो यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात अस्थी व सांध्यांचे आरोग्य जपण्यासाठी आवश्यक असलेल्या जीवनशैलीविषयी तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. वाढते वय, बदलती जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे हाडे व सांध्यांचे विकार वाढत असल्याचे सांगत नियमित शारीरिक हालचाली, कॅल्शियम व व्हिटॅमिन डी युक्त संतुलित आहार, योग्य वजन राखणे आणि वेळेवर वैद्यकीय तपासणी करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. परिचारिकांनीही नागरिकांना हाडांची झीज टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी आणि दैनंदिन जीवनातील आरोग्यदायी सवयींबाबत माहिती दिली.
यावेळी रुग्णसेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टर, निवासी डॉक्टर, परिचारिका तसेच वर्ग-४ कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या समर्पित सेवेला गौरविण्यात आले. आरोग्यसेवेत योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचा सन्मान हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला.
राष्ट्रीय अस्थी व सांधे आरोग्य दिनानिमित्त आयोजित सायक्लोथॉनलाही मोठा प्रतिसाद मिळाला. डॉक्टर, निवासी डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सायकल रॅलीत सहभाग घेत शहरातील विविध मार्गांवरून जनजागृती फेरी काढली. या माध्यमातून नियमित व्यायाम, शारीरिक तंदुरुस्ती आणि अस्थी-सांधे निरोगी ठेवण्याचा संदेश नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.
या उपक्रमाला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्यविषयक संदेशाचे स्वागत केले. समाजात निरोगी जीवनशैलीची सवय रुजविणे, अस्थी व सांध्यांच्या विकारांचे प्रमाण कमी करणे आणि आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी अशा जनजागृती उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले.
