राज्यस्तरीय ‘उद्योजक रत्न’ पुरस्काराने गणेश सोनवणे यांचा गौरव
हातेड बुद्रुकच्या उद्योजकाचा राज्यस्तरीय सन्मान; उत्कृष्ट उद्योजकीय कार्याची दखल, सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
चोपडा | प्रतिनिधी (राहुल पाटील)
चोपडा तालुक्यातील आदर्श गाव हातेड बुद्रुक येथील युवा उद्योजक गणेश रणछोड सोनवणे यांना त्यांच्या उल्लेखनीय उद्योजकीय कार्याची दखल घेत प्रतिष्ठेचा ‘राज्यस्तरीय उद्योजक रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे हातेड बुद्रुक गावासह संपूर्ण चोपडा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार आणि भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशन, भारत सरकार यांच्या वतीने २ ऑगस्ट २०२६ रोजी धुळे येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात गणेश सोनवणे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या गौरवासाठी आयोजित या सोहळ्यात राज्यभरातील अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
उद्योजकता क्षेत्रात सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द, नावीन्यपूर्ण विचार आणि प्रामाणिक कार्यपद्धतीच्या बळावर गणेश सोनवणे यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून त्यांची ‘उद्योजक रत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
गणेश सोनवणे यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील तरुण उद्योजकांना नवी प्रेरणा मिळाली असून, कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन करता येते, हा विश्वास अधिक दृढ झाला आहे. त्यांच्या या यशाबद्दल चोपडा तालुक्यासह विविध सामाजिक, व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यावेळी त्यांचे बंधू प्रवीण शंकराव सोनवणे यांनी भावना व्यक्त करताना, “हा पुरस्कार योग्य व्यक्तीच्या कार्याचा योग्य सन्मान आहे. गणेश यांनी मेहनत, प्रामाणिकपणा आणि सातत्याच्या बळावर हे यश मिळविले असून, त्यांचा हा सन्मान आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अभिमानाची बाब आहे,” असे सांगितले.
या पुरस्कारामुळे गणेश सोनवणे यांच्या कार्याला नवी ओळख मिळाली असून, भविष्यातही उद्योग क्षेत्रात अधिक उल्लेखनीय कार्य करून समाजातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे.
