महाडीबीटी २.० पोर्टलवर अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज सुरू
पात्र विद्यार्थ्यांना लाभापासून वंचित ठेवू नका; महाविद्यालयांच्या प्राचार्यांना समाज कल्याण विभागाच्या स्पष्ट सूचना
पारोळा | प्रतिनिधी : सुरेश पाटोळे
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नव्याने विकसित करण्यात आलेल्या महाडीबीटी २.० (MahaDBT 2.0) पोर्टलवर अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. दि. ६ ऑगस्ट २०२६ पासून ही सुविधा उपलब्ध असून, पात्र विद्यार्थ्यांनी आणि महाविद्यालयांनी विहित कार्यपद्धतीनुसार अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.
महाडीबीटी २.० पोर्टलवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमातील वसतिगृहातील व वसतिगृहाबाहेरील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता अशा विविध योजनांसाठी नवीन तसेच नूतनीकरणाचे अर्ज स्वीकारले जात आहेत.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
-
MahaID नव्याने तयार करणे बंधनकारक.
-
स्वतःचा आधार क्रमांक वापरून नोंदणी करावी.
-
आधारवरील पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल आणि बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवावी.
-
जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास दाखला, गुणपत्रिका आदी आवश्यक कागदपत्रांच्या PDF प्रती तयार ठेवाव्यात.
-
MahaID द्वारे लॉगिन करून अर्ज सादर करावा आणि अर्जाची PDF किंवा प्रिंट जतन करून ठेवावी.
महाविद्यालयांसाठी विशेष निर्देश
समाज कल्याण विभागाने महाविद्यालयांच्या प्राचार्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, केवळ प्राचार्यांच्या लॉगिनद्वारे प्रणालीचा वापर करावा. अभ्यासक्रमनिहाय शुल्क रचना अद्ययावत करून पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित न ठेवता विहित मुदतीत तपासून मंजूर करून पुढे पाठवावेत.
याशिवाय, अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेशावेळी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क आकारू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. संस्थेची माहिती, अभ्यासक्रम, शुल्क रचना आणि मान्यतेसंबंधी तपशील महाडीबीटी २.० पोर्टलवर अद्ययावत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थी वंचित राहिल्यास प्राचार्य जबाबदार
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी आपल्या संस्थेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज अनिवार्यपणे भरून घेऊन वेळेत मंजूर करावेत. अन्यथा, पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची वैयक्तिक जबाबदारी संबंधित प्राचार्यांची राहील, असा इशारा सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी दिला आहे.
