जळगाव जिल्ह्यात डिजिटल पत्रकारितेला बळ; प्रविण पाटील यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड
डिजिटल माध्यमातील पत्रकारांच्या प्रश्नांना संघटित व्यासपीठ मिळणार; नियुक्तीपत्र प्रदान
जळगाव | प्रतिनिधी
डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव आणि या क्षेत्रात कार्यरत पत्रकारांच्या विविध प्रश्नांना संघटित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईच्या डिजिटल मीडिया विभागाच्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी पत्रकार प्रविण श्रावण पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली. राज्य कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्या हस्ते प्रविण पाटील यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
डिजिटल माध्यमांचा विस्तार झपाट्याने होत असताना या क्षेत्रात कार्यरत पत्रकारांसमोर येणारे विविध प्रश्न, अडचणी आणि व्यावसायिक आव्हाने याबाबत संघटितपणे आवाज उठविण्यासाठी ही जबाबदारी महत्त्वाची ठरणार आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्यातील डिजिटल पत्रकारांना आपल्या प्रश्नांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
पत्रकारिता क्षेत्रातून अभिनंदन
प्रविण पाटील यांच्या निवडीचे पत्रकारिता, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले आहे. सचिन गोसावी, नगराज पाटील, भूषण महाजन, भगवान मराठे, संतोष नवले, योगेश सैतवाल, गोपाल सोनवणे, संजय चौधरी, अबरार मिर्झा, चंदू खरे यांच्यासह अनेकांनी प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनीवरून त्यांचे अभिनंदन केले. नवीन जबाबदारीच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील डिजिटल पत्रकारांचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रविण पाटील प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
