महसूल सेवा अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ — आमदार ॲड. अमोलदादा पाटील
पारोळ्यात महसूल समाधान शिबिराचे आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन; नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ सुलभपणे मिळवून देण्याचे आवाहन
पारोळा/सुरेश पाटोळे (प्रतिनिधी)
पारोळा, एरंडोल व अमळनेर तालुक्यातील महसूल विभागाच्या सेवा-सुविधा अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन महसूल व वनविभागाच्या निर्देशानुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानांतर्गत पारोळा येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिराचे उद्घाटन एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड.अमोलदादा चिमणरावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख प्रा.मनोजभाऊ पाटील, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक जगदीशदादा पाटील, उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मनिषभाऊ पाटील, जि.प.मा.उपाध्यक्ष ज्ञानेश्वरनाना आमले, जि.प.मा.कृषी सभापती डॉ.दिनकर पाटील, मुद्रांक जिल्हाधिकारी मंदारजी कुलकर्णी, एरंडोल भागाचे उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड, पारोळा तहसिलचे तहसिलदार डॉ.उल्हासजी देवरे, एरंडोल तहसिलचे तहसिलदार गोपाल पाटील, पारोळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषारजी देवरे, पारोळा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, एरंडोल नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकूर, शेतकी संघाचे मा.अध्यक्ष तथा संचालक चतुरभाऊसाहेब पाटील, मा.नगराध्यक्ष दयारामअण्णा पाटील, धरणगांव बाजार समितीचे मा.सभापती शालिकभाऊ गायकवाड, पारोळा शिवसेनेचे तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, एरंडोल शिवसेनेचे तालुकाप्रमुख रविभाऊ जाधव, भाजपा पारोळा तालुकाध्यक्ष अतुलआण्णा पवार, शिवसेना शहरप्रमुख, गटनेते तथा नगरसेवक अमृतभाऊ चौधरी, भाजपा शहराध्यक्ष तथा पारोळा विकासोचे उपाध्यक्ष मुकुंदाभाऊ चौधरी, भाजपा गटनेते तथा नगरसेवक धीरजजी महाजन, पारोळा नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष ॲड.रोहनजी मोरे, एरंडोल नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथा युवासेना शहरप्रमुख कृष्णा ओतारी, शिवसेना प्रतोद तथा नगरसेवक नितीनभाऊ सोनार, शिवसेना उपगटनेते तथा नगरसेवक पंकजभाऊ मराठे, नगरसेवक मनोजभाऊ जगदाळे, राजूभाऊ कासार, छोटू पाटील, भावडू राजपूत, अतुलभाऊ महाजन, अनिलभाऊ महाजन, दगडू पवार सर यांचेसह शिवसेना-भाजपा महायुतीचे व विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, शिवसैनिक, पत्रकार, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विविध विभागांतर्गत पात्र लाभार्थी, आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या निर्णयानुसार शासनाच्या विविध योजनांचा व महसूल विभागाशी संबंधित सेवांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले. मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या जन्मदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘शासकीय कार्यालयात नागरिकांनी हेलपाटे मारण्याऐवजी सेवा नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे’ — आमदार अमोलदादा पाटील
कार्यक्रमाला संबोधित करताना आमदार ॲड. अमोलदादा पाटील यांनी महसूल विभाग हा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट जोडलेला विभाग असल्याचे सांगितले. जमिनीच्या नोंदी, फेरफार, विविध दाखले, महसूल विषयक प्रकरणे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेताना नागरिकांना अनावश्यक अडचणी येऊ नयेत, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने व तत्परतेने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
“शासनाच्या योजना आणि निर्णय हे केवळ कागदावर न राहता त्याचा प्रत्यक्ष लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे हीच खरी लोकसेवा आहे. नागरिकांना आपल्या कामासाठी वारंवार कार्यालयात येण्याची वेळ येऊ नये, त्यांचे प्रश्न एकाच ठिकाणी ऐकून घेऊन त्यावर योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे.” असे आवाहन आमदार अमोलदादांनी केले.
महसूल समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध महसूलविषयक अडचणी, प्रलंबित प्रकरणे व आवश्यक सेवांबाबत मार्गदर्शन मिळणार असल्याने नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
तसेच महसूल प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होऊन पारदर्शक व गतिमान कारभाराला चालना मिळावी, यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने आवश्यकता असल्याचे आमदारांनी स्पष्ट केले.
नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना
यावेळी उपस्थित महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जांवर व तक्रारींवर वेळेत कार्यवाही करण्याच्या सूचना करण्यात आल्या. शासनाच्या विविध सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना सुलभ भाषेत देऊन पात्र लाभार्थ्यांना त्यांचा लाभ मिळवून देण्यावर भर देण्याचेही यावेळी सांगण्यात आले.
सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत प्रशासन अधिक संवेदनशील, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याच्या दिशेने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.
