शिक्षक आपल्या दारी! विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी म्युनिसिपल हायस्कूलचा अनोखा उपक्रम
भानखेळा व तिघरा येथे घरोघरी जाऊन पालकांशी संवाद; ‘पाल्याला नियमित शाळेत पाठवा’चे आवाहन
भुसावळ | प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे, शाळेतील उपस्थिती वाढविणे आणि शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे या उद्देशाने नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळच्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अनोखा उपक्रम राबविला. ‘शिक्षण आपल्या दारी’ या संकल्पनेतून शिक्षकांनी भानखेळा आणि तिघरा या गावांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या घरोघरी पालकांच्या भेटी घेतल्या.
या गावांमधील अनेक पालकांचा उदरनिर्वाह हातमजुरीवर अवलंबून आहे. भुसावळ येथील शाळेत आयोजित पालक सभेला उपस्थित राहण्यासाठी त्यांना ये-जा करण्यासाठी सुमारे ५० रुपये खर्च येतो. त्याचबरोबर बैठकीसाठी एक दिवसाचा रोजगारही बुडतो. त्यामुळे पालकांना शाळेतील बैठकींना उपस्थित राहण्यात अडचणी येत असल्याचे लक्षात घेऊन शाळेच्या वतीने गावातील प्राथमिक शाळेतच पालक-शिक्षक सभा आयोजित करण्यात आली.

नियमित उपस्थितीवर भर
सभेत डॉ. प्रदीप साखरे यांनी पालकांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी दररोज नियमितपणे शाळेत उपस्थित राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नियमित उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येते आणि त्यांच्या गुणवत्तेतही सुधारणा होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
पालकांनी आपल्या पाल्याने शाळेत दिलेला गृहपाठ आणि अभ्यास पूर्ण केला आहे की नाही, याची दररोज विचारपूस करावी. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देऊन त्यांना नियमितपणे शाळेत पाठवावे, असे आवाहनही करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात शिक्षकांप्रमाणेच पालकांची भूमिकाही महत्त्वाची आहे, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
शिक्षक-पालक संघाचे सचिव नाना पाटील यांनी शिक्षक-पालक संघाच्या कार्याची माहिती पालकांना दिली.
शासकीय योजनांची माहिती
शाळेचे मुख्याध्यापक व्ही. पी. सुलताने यांनी पालकांना आगामी परीक्षेबाबत आवश्यक मार्गदर्शन केले. तसेच शासनामार्फत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक व कल्याणकारी योजनांची माहिती देत या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांनी नियमितपणे शाळेत उपस्थित राहून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकून राहणे गरजेचे आहे, असे सांगत पालकांनी आपल्या पाल्याला नियमित शाळेत पाठवावे, असेही मुख्याध्यापक सुलताने यांनी आवाहन केले.
घरोघरी जाऊन पालकांचे प्रबोधन
या उपक्रमात रेखा सोनवणे, ज्योती शिरतुरे, संध्या धांडे, पुनम देवकर, एस. टी. चौधरी, डी. के. भंगाळे, एन. एच. राठोड, नाना पाटील, लक्ष्मण पवार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन पालकांशी संवाद साधत, ‘आपला पाल्य नियमित शाळेत पाठवा, त्याच्या शिक्षणाकडे लक्ष द्या आणि गुणवत्तावाढीसाठी शाळेला सहकार्य करा,’ असे आवाहन केले.
शाळा विद्यार्थ्यांच्या दारी आणि शिक्षण पालकांच्या दारी पोहोचविणाऱ्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
