कै. शामकांत गोयर यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त मतिमंद मुलींच्या बालगृहात अन्नदान
गोयर परिवाराचा सामाजिक सेवेचा वारसा जपण्याचा निर्धार; गरजू मुलींसाठी संवेदनशील उपक्रम
धुळे | प्रतिनिधी
मेहतर वाल्मिकी समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. शामकांत गोयर यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त गोयर परिवारातर्फे यमुनाबाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळ, धुळे संचलित श्री. संस्कार मतिमंद मुलींच्या बालगृहात अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून समाजसेवेचा वारसा जपत गरजू मुलींबद्दल संवेदनशीलता व्यक्त करण्यात आली.
सामाजिक कार्याची प्रेरणादायी परंपरा
कै. शामकांत गोयर यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजातील दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेकांना धुळे महानगरपालिकेत रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना पुरस्कार जाहीर केला होता. मात्र, पुरस्कार स्वीकारण्यापूर्वीच त्यांचे दुःखद निधन झाले.
‘वडिलांचा समाजसेवेचा वसा कायम जपू’
पुण्यस्मरणानिमित्त आयोजित या उपक्रमावेळी गोयर परिवारातील सदस्यांनी, “वडिलांनी सुरू केलेला समाजसेवेचा वसा आम्ही कायम जपत राहू,” असा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
या प्रसंगी मधुभाई श्याम गोयर, विजय शाम गोयर, विलास श्याम गोयर, विक्रम शाम गोयर, लोकेश गोयर, मुकेश गोयर, काशिनाथ लोहा, लखन चांगरे, जावडेकर दादा, चंदन घारू, विजय पवार, विजय नख्वाल, साजन सिस्वाल, सागर भाऊ परदेशी, अवि ग्रुप फागणे, शिवशक्ती ग्रुप, अमोल जाधव, दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापू बागुल व त्यांचा ग्रुप, इच्छापूर्ती मारुती मित्र मंडळ, धुळे तसेच वाल्मिकी मेहतर समाजातील नागरिक आणि धुळ्यातील मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
