पुण्यात रंगणार राष्ट्रीय स्तरावरील ‘विकसित भारत यूथ कॉन्क्लेव्ह-२०२६’; तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन
देशभरातील १ हजार युवा प्रतिनिधींचा सहभाग; क्रीडा, नवोन्मेष, तंत्रज्ञान, उद्योजकता व संस्कृतीला मिळणार व्यासपीठ
पुणे | विशेष प्रतिनिधी – हर्षल पाटील
देशभरातील युवकांना क्रीडा, नवोन्मेष, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि सांस्कृतिक क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे तीन दिवसीय राष्ट्रीय ‘विकसित भारत यूथ कॉन्क्लेव्ह-२०२६’ आयोजित करण्यात येणार आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाची घोषणा केली.
देशभरातील युवकांना एकाच व्यासपीठावर आणून नेतृत्वगुण, नवोन्मेष आणि उद्योजकतेला चालना देण्याबरोबरच सांस्कृतिक विविधता आणि राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी देणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे.
देशभरातून १ हजार युवा प्रतिनिधी
महोत्सवात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतून सुमारे १ हजार युवा प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे ३००, तर अन्य राज्यांतील ७०० प्रतिनिधींचा समावेश असेल.
‘वॉरियर’, ‘फ्युचर’ आणि ‘कल्चरल’ अनुभव क्षेत्रे
महोत्सवाची संकल्पना ‘वॉरियर’, ‘फ्युचर’ आणि ‘कल्चरल’ या तीन प्रमुख अनुभव क्षेत्रांवर आधारित असेल. युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे, नव्या कल्पनांना वाव देणे, उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणे आणि देशातील सांस्कृतिक वैविध्याचा परिचय करून देणे यावर विशेष भर राहणार आहे.
डिजिटल नोंदणीची सुविधा
महोत्सवात सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींसाठी संपूर्ण प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीने पूर्णपणे डिजिटल नोंदणी प्रणाली विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.
“महाराष्ट्राला आगामी दशकात क्रीडा क्षेत्रात देशात आघाडीवर नेण्यासाठी शासकीय प्रयत्नांसोबतच खासगी क्षेत्राची (PPP Model) गुंतवणूक आणि कॉर्पोरेट क्रीडा फाउंडेशनशी समन्वय अत्यंत आवश्यक आहे.”
— देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
क्रीडा क्षेत्रातील गुंतवणुकीवरही भर
महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी शासनासोबत खासगी क्षेत्राचा सहभाग वाढविण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले. PPP मॉडेल तसेच कॉर्पोरेट क्रीडा फाउंडेशनच्या माध्यमातून पायाभूत सुविधा आणि युवकांना उपलब्ध होणाऱ्या संधी वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
या आढावा बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त दीपक सिंगला यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
