ह.भ.प. सुनील महाराज शास्त्री यांना मानाचा ‘सावित्री शक्ती पुरस्कार’; माळी समाजात आनंदाची लहर
समाजप्रबोधन, सामाजिक एकोपा आणि अध्यात्मिक कार्याची पुरस्काराद्वारे दखल
नशिराबाद | प्रतिनिधी – धीरज सैतवाल
समस्त माळी पंचचे अध्यक्ष ह.भ.प. सुनील महाराज शास्त्री यांना सावित्रीबाई फुले शक्तीपीठ, पुणे यांच्या वतीने प्रतिष्ठित ‘सावित्री शक्ती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक, धार्मिक आणि अध्यात्मिक कार्याची दखल घेत मिळालेल्या या सन्मानामुळे माळी समाजात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
समाजप्रबोधनातील योगदानाची दखल
ह.भ.प. सुनील महाराज शास्त्री हे समाजप्रबोधन, सामाजिक एकोपा, संस्कार आणि अध्यात्माच्या माध्यमातून समाजाला सकारात्मक दिशा देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. समाजबांधवांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यासोबतच संस्कार आणि अध्यात्माची ज्योत तेवत ठेवण्याच्या त्यांच्या कार्याची या पुरस्काराद्वारे दखल घेण्यात आली आहे.
निस्वार्थ समाजसेवेची भावना, समाजाच्या प्रश्नांविषयी असलेली तळमळ आणि सकारात्मक विचारसरणी यामुळे ते समाजबांधवांसाठी प्रेरणास्थान ठरत असल्याचे यावेळी गौरवोद्गार काढण्यात आले.
समाजबांधवांकडून अभिनंदन
‘सावित्री शक्ती पुरस्कार’ मिळाल्याबद्दल समस्त माळी पंच तसेच समाजबांधवांच्या वतीने ह.भ.प. सुनील महाराज शास्त्री यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या हातून सामाजिक, धार्मिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातील कार्य यापुढेही अविरत सुरू राहावे, तसेच त्यांना उत्तम आरोग्य, यश आणि दीर्घायुष्य लाभावे, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
“ह.भ.प. सुनील महाराज शास्त्री यांना ‘सावित्री शक्ती पुरस्कार’ मिळाल्याबद्दल सर्व समाजबांधवांकडून हार्दिक अभिनंदन व पुढील सामाजिक, धार्मिक आणि आध्यात्मिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!”
जय संत सावता महाराज!
जय महात्मा ज्योतिराव फुले!
जय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले!
रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी!
