आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात एल्गार; छत्रपती संभाजीनगरात हजारोंचा जनसमुदाय रस्त्यावर
SC आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरण रद्द करण्याची मागणी; आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा
सोयगाव | प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर शहरात अनुसूचित जातीच्या (SC) आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरणाविरोधात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले असून, हातात निळे झेंडे घेत मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरला आहे.
आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चातून अनुसूचित जातीच्या आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे. आरक्षणाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आंदोलकांनी एकजूट दाखवत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग
मोर्चात विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. निळे झेंडे आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या हक्कांवर परिणाम होण्याची भीती आंदोलकांकडून व्यक्त करण्यात आली.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले असून, मोर्चाच्या हालचालींवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.
