जीर्ण पुलामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे हाल; चिमुकली विद्यार्थिनीची व्हिडिओतून आर्त हाक
बोंडगावदेवी–खांबी मार्गावरील पूल धोकादायक; महिनाभरापासून एसटी बससेवा बंद, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
गोंदिया | प्रतिनिधी
गोंदिया जिल्ह्यातील बोंडगावदेवी–खांबी मार्गावरील जीर्ण आणि धोकादायक पुलामुळे परिसरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. पुलाची दुरवस्था झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या महिनाभरापासून या मार्गावरील एसटी बससेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामानिमित्त प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
चिमुकली विद्यार्थिनीने मांडली व्यथा
या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एका शाळकरी विद्यार्थिनीने थेट पुलावर उभे राहून व्हिडिओच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली. पुलाच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, याकडे तिने प्रशासनाचे लक्ष वेधले.
या विद्यार्थिनीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर पुलाच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
महिनाभरापासून बससेवा बंद
पूल जीर्ण झाल्याने या मार्गावरून एसटी बसची वाहतूक बंद करण्यात आली आहे. परिणामी, शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह रोजच्या कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना पर्यायी मार्गाचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे वेळ आणि प्रवासाचा खर्च वाढत असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
दुरुस्ती अथवा नवीन पुलाची मागणी
पुलाची सद्यस्थिती पाहता मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. जीर्ण पुलाची तातडीने दुरुस्ती करावी अथवा आवश्यक असल्यास नवीन पूल उभारावा आणि बंद असलेली एसटी बससेवा पूर्ववत करावी, अशी आग्रही मागणी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
चिमुकल्या विद्यार्थिनीने व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेली ही आर्त हाक आता प्रशासनापर्यंत पोहोचते का आणि पुलाच्या प्रश्नावर तातडीने निर्णय होतो का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
