अमर दुधाच्या दरात वाढ; प्रति लिटर २ रुपयांनी दरवाढ लागू
महागाईचा सर्वसामान्यांना पुन्हा झटका; १२ ऑगस्टपासून नवीन दर लागू
नशिराबाद | धीरज सैतवाल, विशेष प्रतिनिधी
वाढत्या महागाईचा फटका पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला बसला आहे. ‘अमर’ (AMAR) ब्रँडच्या दूधाच्या विक्री दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ करण्यात आली असून, बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ पासून नवीन दर संपूर्ण परिसरात लागू करण्यात आल्याची माहिती आहे.
उत्पादन व वाहतूक खर्च वाढल्याचा परिणाम
दूध उत्पादनासाठी लागणाऱ्या विविध खर्चात वाढ, पॅकेजिंग साहित्याचे वाढलेले दर तसेच वाहतूक खर्चात झालेली वाढ यामुळे दूधाच्या विक्री दरात सुधारणा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
गृहिणींच्या बजेटवर अतिरिक्त भार
यापूर्वीच खाद्यपदार्थांसह दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांचे घरगुती बजेट विस्कळीत झाले आहे. त्यातच दूधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ झाल्याने गृहिणींच्या मासिक खर्चात आणखी भर पडणार आहे. दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये नाराजी आणि चिंतेचा सूर उमटत आहे.
