दहिगावात संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत; गोठ्यांमध्ये पाणी शिरल्याने पशुधनाचा प्रश्न गंभीर
ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टोलवाटोलवीमुळे शेतकरी त्रस्त; कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी
यावल | प्रतिनिधी : हर्षल पाटील
तालुक्यातील दहिगाव आणि परिसरात मंगळवार, दि. ११ ऑगस्टपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सावखेडासिम रस्त्यालगत असलेल्या गुरांच्या गोठ्यांमध्ये पुन्हा पावसाचे पाणी शिरल्याने साठवून ठेवलेला चारा भिजून खराब झाला आहे. त्यामुळे पशुधनाच्या सुरक्षिततेसह शेतकऱ्यांसमोर चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, मागील अतिवृष्टीच्या काळातही याच ठिकाणी पाणी शिरले होते. वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
चारा भिजला; पशुधनासाठी कोरड्या जागेचा अभाव
दहिगाव परिसरात पावसामुळे रस्ते, गल्लीबोळ आणि सखल भागात पाणी साचले आहे. सावखेडासिम रस्त्यालगतच्या गोठ्यांकडे जाणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने पावसाचे पाणी थेट गोठ्यांमध्ये शिरत आहे. त्यामुळे सुका चारा भिजून खराब झाला असून, जनावरांना बांधण्यासाठी कोरडी जागाही उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
ग्रामपंचायत आणि PWD मध्ये टोलवाटोलवी
या समस्येबाबत संबंधित शेतकऱ्यांनी यापूर्वी ग्रामपंचायत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तडवी यांनी घटनास्थळी पाहणी केली होती. मात्र, संबंधित काम ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असल्याचे सांगण्यात आले.
दुसरीकडे ग्रामपंचायतीकडून हा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्याचे सांगितले जात असल्याने दोन्ही विभागांच्या टोलवाटोलवीत शेतकरी भरडले जात असल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
गटारींच्या चुकीच्या उतारामुळे पाणी गोठ्यांकडे?
गटारींमधून वाहणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने पाणी ओव्हरफ्लो होऊन परिसरात साचत आहे. गटारींचा उतार चुकीच्या पद्धतीने देण्यात आल्यामुळे पाणी वाहून जाण्याऐवजी गोठे आणि वस्तीच्या दिशेने वळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
संबंधित गटारीची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी आणि पावसाच्या पाण्याचा कायमस्वरूपी निचरा होण्यासाठी व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
डासांचा उपद्रव वाढला; आजारांचा धोका
साचलेल्या पाण्यामुळे परिसरात डासांचा उपद्रव वाढला असून दुर्गंधीही पसरली आहे. त्यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने साचलेले पाणी तातडीने काढून परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
सुरेश आबानगरला तलावाचे स्वरूप
दरम्यान, दहिगावातील सुरेश आबानगर परिसरातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने अक्षरशः तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरवर्षी तात्पुरत्या उपाययोजना करण्याऐवजी ग्रामपंचायत आणि संबंधित विभागांनी संयुक्त पाहणी करून पाणी निचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
