‘मी राष्ट्रवादीतच राहणार’; विरोधकांचा बदनाम करण्याचा कुटील डाव असल्याचा माजी आमदार फारुख शहांचा दावा
‘सुशीनाला’ प्रकरणात फुकटचे श्रेय घेऊ नये; नाव न घेता खासदारांवर टीका
धुळे | प्रतिनिधी
“मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असून, राष्ट्रवादीच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम सुरू आहे. माझ्या एमआयएममध्ये जाण्याच्या केवळ अफवा पसरवल्या जात असून, हा विरोधकांचा मला बदनाम करण्याचा कुटील डाव आहे,” असा स्पष्ट खुलासा माजी आमदार फारुख शाह यांनी केला.
प्रभाग क्रमांक १९ मधील शब्बीर नगर येथे रस्ते कामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी ‘सुशीनाला’ येथील अतिक्रमणाच्या प्रश्नावरून काही लोकप्रतिनिधींवर नाव न घेता टीका केली.
‘अतिक्रमणाचा प्रश्न सोडविण्यासाठी वर्षभरापासून पाठपुरावा’
“सुशीनाला येथील अतिक्रमणाचा प्रश्न थांबविण्यासाठी अजित पवार यांच्या माध्यमातून वर्षभरापासून वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू केला होता. मात्र, आयुक्तांनी नागरिकांवर अन्याय केला,” असा आरोप फारुख शाह यांनी केला.
“या नागरिकांना त्याच ठिकाणी पक्की घरे बांधून देण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, काही लोकप्रतिनिधी या प्रकरणाचे फुकटचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत,” अशी टीका त्यांनी केली.
शब्बीर नगरमध्ये २५ लाखांच्या रस्ते कामाचा शुभारंभ
प्रभाग क्रमांक १९ मधील शब्बीर नगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची समस्या होती. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिकांनी ही समस्या माजी आमदार फारुख शाह यांच्याकडे मांडल्यानंतर नगरविकास विभागाच्या मूलभूत सोयी-सुविधा योजनेतून २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
या निधीतून होणाऱ्या रस्ते कामाचा शुभारंभ फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला. काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना दर्जेदार रस्ता उपलब्ध होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते रफिक शहा पठाण, माजी नगरसेवक सद्दाम खान, समीर खान, डॉ. दीपश्री नाईक, कैसर शहा, भिकन शाह, अजहर अली सय्यद यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
