‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत नगरदेवळेत वीरमातेच्या हस्ते ध्वजारोहण
शहीद जवान भैय्यासाहेब बागुल यांच्या मातोश्री तुळसाबाई बागुल यांच्या हस्ते ध्वजारोहण; विद्यार्थ्यांची गावातून प्रभातफेरी
नगरदेवळे | दि. १३ ऑगस्ट २०२६ :
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत नगरदेवळे येथील सरदार एस. के. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज देशभक्तीपूर्ण वातावरणात ध्वजारोहण समारंभ पार पडला. नगरदेवळे येथील सुपुत्र शहीद जवान भैय्यासाहेब बागुल यांच्या मातोश्री तथा वीरमाता श्रीमती तुळसाबाई रोहिदास बागुल यांच्या हस्ते सकाळी ७.३० वाजता ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम्ने झाली. त्यानंतर ध्वजारोहण, राष्ट्रगीत, झंडागीत आणि महाराष्ट्र गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य के. एन. काटकर होते. उपप्राचार्य एस. पी. बावस्कर यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी प्राचार्य के. एन. काटकर यांच्या हस्ते वीरमाता तुळसाबाई बागुल यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. शहीद जवानाच्या मातोश्रींच्या हस्ते ध्वजारोहण झाल्याने कार्यक्रमाला विशेष भावनिक आणि देशभक्तीपूर्ण स्वरूप प्राप्त झाले.
विद्यार्थ्यांची गावातून देशभक्तीपर प्रभातफेरी
ध्वजारोहणानंतर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावातून भव्य प्रभातफेरी काढली. हातात तिरंगा घेऊन आणि देशभक्तीपर घोषणांसह विद्यार्थ्यांनी नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. प्रभातफेरीचे गावातील नागरिक व महिलांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
ग्राम शिक्षण समितीचे मानद चिटणीस बापूसाहेब शिवनारायण जाधव तसेच नगरदेवळे नगरीच्या प्रथम नागरिक सौ. प्रतीक्षाताई किरण काटकर यांनी प्रभातफेरीचे स्वागत करून त्यात सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांची प्रभातफेरी हा गावातील नागरिकांसाठी आकर्षणाचा विषय ठरला. प्रभातफेरीनंतर विद्यालयाच्या परिसरात रॅलीचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षक जी. यू. पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सकाळ सत्रातील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
