मृत्यूनंतरही जगता येणार; नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्राचा अवयवदानाचा महासंकल्प!
‘माझा गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत अवयवदान जनजागृती रॅली; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नशिराबाद | दि. १३ ऑगस्ट २०२६ :
“आपल्या मृत्यूनंतरही आपले डोळे कोणाला तरी दृष्टी देऊ शकतात, तर आपले अवयव एखाद्याला नवजीवन देऊ शकतात. अवयवदान हे केवळ दान नसून मानवतेला दिलेले जीवनदान आहे,” असा संदेश देत प्राथमिक आरोग्य केंद्र, नशिराबाद यांच्या वतीने जागतिक अवयवदान दिनानिमित्त गावात भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली.
राज्य शासनाच्या ‘माझा गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत आयोजित या रॅलीचे नियोजन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव भदादे, डॉ. स्नेहा कोलते आणि डॉ. अमन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या उपक्रमाला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग देत मोठे बळ दिले.
घोषणांनी गाव दुमदुमले
नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी हातात माहितीपत्रके व जनजागृतीपर पोस्टर्स घेत ‘अवयवदान—श्रेष्ठ दान’, ‘चला अवयवदानाचा संकल्प करूया, मानवतेचे ऋण फेडूया’ अशा घोषणांनी नागरिकांमध्ये जनजागृती केली. गावातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून अवयवदानाबाबत असलेल्या गैरसमज, अंधश्रद्धा आणि भीती दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
एका व्यक्तीच्या अवयवदानातून अनेकांना जीवनदान
रॅलीच्या सांगता सभेत डॉ. प्रणव भदादे, डॉ. स्नेहा कोलते आणि डॉ. अमन पटेल यांनी अवयवदानाबाबत शास्त्रीय माहिती दिली. ब्रेनडेड व्यक्तीच्या अवयवदानातून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते, असे सांगत ग्रामीण भागातील नागरिकांनीही अवयवदान चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
आरोग्य कर्मचाऱ्यांचे योगदान
रॅलीचे शिस्तबद्ध संचलन आरोग्य सेवक दीपक तायडे, सुनील ढाके, संदेश महाजन आणि वासुदेव पाटील यांनी केले. तांत्रिक व्यवस्था प्रयोगशाळा तंत्रज्ञ नीलिमा येलगिरे व विजय सपकाळे यांनी सांभाळली.
रॅलीदरम्यान व्यवस्था राखण्यासाठी १०२ रुग्णवाहिका चालक राजाराम पाचपांडे तसेच १०८ रुग्णवाहिका चालक जीवन शिरसाठ व बापू मराठे यांनी मोलाचे योगदान दिले.
आरोग्य विभागाच्या या जनजागृतीपर उपक्रमामुळे नागरिकांमध्ये अवयवदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, लोकप्रतिनिधी व परिसरातील नागरिकांकडून संपूर्ण आरोग्य पथकाचे कौतुक करण्यात येत आहे.
