रा. ति. काबरे विद्यालयात विद्यार्थ्यांना सायबर क्राईमविषयी मार्गदर्शन
डिजिटल व्यवहारात सावधगिरी बाळगण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन
एरंडोल | प्रतिनिधी :
रा. ति. काबरे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, एरंडोल येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर क्राईम व सायबर सुरक्षेविषयी जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. डिजिटल माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता विद्यार्थ्यांनी ऑनलाइन व्यवहार करताना आवश्यक ती काळजी घेण्याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थिनी कुमारी स्नेहल पाटील व कुमारी वैष्णवी पाटील यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार तसेच त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांची माहिती दिली. सोशल मीडिया वापरताना सावधगिरी बाळगणे, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, वैयक्तिक माहिती व पासवर्ड सुरक्षित ठेवणे आणि ऑनलाइन फसवणुकीपासून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.
सायबर गुन्हा घडल्यास घाबरून न जाता तातडीने योग्य ती खबरदारी घेणे आणि संबंधित यंत्रणेशी संपर्क साधणे आवश्यक असल्याचेही विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारून सायबर सुरक्षेविषयी माहिती जाणून घेतली.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.
कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. एस. राठी, उपमुख्याध्यापक श्री. पी. एच. नेटके, शिक्षक प्रतिनिधी श्री. एस. बी. चव्हाण तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
