जिजामाता माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना सायबर क्राईमविषयी मार्गदर्शन
OTP, पासवर्ड, QR कोड आणि अनोळखी लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन; मार्गदर्शक बुकलेटचे वाटप
एरंडोल, जि. जळगाव | प्रतिनिधी :
डिजिटल माध्यमांचा वाढता वापर आणि ऑनलाइन फसवणुकीच्या घटना लक्षात घेता जिजामाता माध्यमिक विद्यालय, एरंडोल येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर क्राईम व सायबर सुरक्षेविषयी जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मोबाईल, सोशल मीडिया तसेच ऑनलाइन व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमात बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थिनी कुमारी स्नेहल पाटील व कुमारी वैष्णवी पाटील यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार समजावून सांगितले. सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित ठेवणे, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, OTP व पासवर्ड कोणालाही न सांगणे, तसेच QR कोडच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
ऑनलाइन फसवणूक झाल्यास घाबरून न जाता तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे आवाहनही विद्यार्थ्यांना करण्यात आले.
सायबर सुरक्षेच्या मार्गदर्शक बुकलेटचे वाटप
यावेळी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा आणि ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शक बुकलेटचे वाटप करण्यात आले. दैनंदिन डिजिटल व्यवहारात सुरक्षितता राखण्यासाठी या बुकलेटमधील माहिती उपयुक्त ठरणार असून, त्यातील मार्गदर्शक सूचनांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली.
कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. प्रविण शंभू केदार तसेच ज्युनिअर क्लर्क श्री. आर. आर. वाघ उपस्थित होते.
