नाशिकरोड–बडनेरा मेमू नियमित; खान्देश-विदर्भ प्रवाशांना मोठा दिलासा
१५ ऑगस्टपासून गाडी क्र. ०१२११/०१२१२ धावणार; विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी स्वस्त व सुरक्षित प्रवासाचा पर्याय
नाशिक | विशेष प्रतिनिधी : मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती मागणी आणि सोय लक्षात घेऊन गाडी क्रमांक ०१२११/०१२१२ नाशिकरोड–बडनेरा–नाशिकरोड मेमू ट्रेन १५ ऑगस्ट २०२६ पासून नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाच्या कोचिंग नोटिफिकेशन क्रमांक ७००/२०२६ नुसार या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाला जोडणारी ही रेल्वेसेवा नियमित झाल्याने हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मेमू ट्रेनच्या नियमितीकरणासाठी तसेच तसेच म्हसावद थांब्यासाठी रेल्वेकडे केंद्रीय राज्य मंत्री रक्षाताई खडसे आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
नाशिक-जळगावसह विदर्भाशी संपर्क अधिक मजबूत
नाशिकरोड ते बडनेरा या मार्गावर मेमूला बहुतांश स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला आणि मुर्तिजापूर या प्रमुख स्थानकांमुळे नाशिक व जळगाव जिल्ह्याचा विदर्भाशी नियमित रेल्वे संपर्क अधिक सुलभ होणार आहे. सर्व थांबे आणि अद्ययावत वेळापत्रकासाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या NTES ॲपचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
म्हसावद थांब्याची मागणी प्रलंबित
जळगाव जिल्ह्यातील म्हसावद येथे मेमूला थांबा देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, सध्या ट्रेन नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून म्हसावद थांब्याच्या मागणीचा स्वतंत्रपणे नंतर विचार केला जाईल, अशी माहिती भुसावळ डीआरएम यांनी दिली.
शेतकरी-व्यापाऱ्यांना मोठा फायदा
नाशिक हा कांदा व द्राक्ष उत्पादनाचा प्रमुख पट्टा, तर जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील कृषी व्यापाराला या रेल्वेसेवेचा फायदा होण्याची शक्यता आहे. बाजार समित्यांमध्ये ये-जा करणाऱ्या शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी ही ट्रेन स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय ठरणार आहे.
विद्यार्थी, नोकरदारांसाठीही सोयीची
मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव आणि भुसावळ या मार्गावरील हजारो विद्यार्थी व चाकरमान्यांना नियमित मेमूमुळे मोठी सोय होणार आहे. अनारक्षित मेमू असल्याने सामान्य प्रवाशांना तुलनेने कमी खर्चात लांब पल्ल्याचा प्रवास करता येणार आहे.
नाशिकरोड–बडनेरा मेमूचे वेळापत्रक
गाडी क्र. ०१२१२ : नाशिकरोड ते बडनेरा
नाशिकरोड–बडनेरा मेमूचे सुधारित वेळापत्रक
१५ ऑगस्ट २०२६ पासून लागू होणाऱ्या नव्या वेळापत्रकानुसार नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील प्रमुख स्थानकांवरील अंदाजित वेळा पुढीलप्रमाणे आहेत.
गाडी क्र. ०१२१२: नाशिकरोड ते बडनेरा मेमू
स्थानक | आगमन वेळ | प्रस्थान वेळ
* नाशिकरोड| — | २१:१५
* लासलगाव | २१:५४ | २१:५५ • मनमाड जंक्शन | २२:४५ | २२:५०
* नांदगाव | २३:१४ | २३:१५
* चाळीसगाव जंक्शन | २३:५४ | २३:५५
* पाचोरा जंक्शन | ००:२४ | ००:२५
* जळगाव जंक्शन | ०१:२० | ०१:२५
* भुसावळ जंक्शन | ०२:१० | ०२:१५
* मलकापूर | ०३:०८ | ०३:१०
* शेगाव | ०३:५८ | ०४:००
* अकोला जंक्शन | ०५:०० | ०५:०५
* मुर्तिजापूर | ०५:४३ | ०५:४५
* बडनेरा जंक्शन | ०७:३० | —
गाडी क्र. ०१२११: बडनेरा ते नाशिकरोड मेमू
_स्थानक | आगमन वेळ | प्रस्थान वेळ-
* बडनेरा जंक्शन | — | ११:०५
* मुर्तजापूर | ११:३३ | ११:३५
* अकोला जंक्शन | १२:१५ | १२:२०
* शेगाव | १२:५३ | १२:५५
* मलकापूर | १३:४८ | १३:५०
* भुसावळ जंक्शन | १५:१० |१५:१५
* जळगाव जंक्शन | १५:४० | १५:४५
* पाचोरा जंक्शन | १६:२३ | १६:२५
* चाळीसगाव जंक्शन | १७:०८ | १७:१०
* नांदगाव | १७:४३ | १७:४५
* मनमाड जंक्शन | १८:३५ | १८:४०
* लासलगाव | १८:५९ | १९:००
* नाशिकरोड | २०:२५ | —
—-xx—-
