ऑपरेशन ‘३/२५’चा जिल्हाभर धडाका; १० वर्षांतील शस्त्र गुन्हेगारांच्या घरांवर पहाटे छापे
२१४ संशयितांच्या घरांची व वाहनांची झाडाझडती; ७ गावठी कट्टे, १९ जिवंत काडतुसे, तलवार, चाकूसह ७.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव | प्रतिनिधी : आगामी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी जळगाव पोलिसांनी ‘ऑपरेशन ३/२५’ ही विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी पहाटे ६ वाजेपासून जिल्हाभर एकाचवेळी कारवाई करण्यात आली.
गेल्या १० वर्षांत शस्त्र कायद्यान्वये गुन्हे दाखल असलेल्या तसेच शस्त्रांच्या वापराशी संबंधित गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या २१४ आरोपींच्या घरांची, वास्तव्याच्या ठिकाणांची आणि वाहनांची अचानक तपासणी करण्यात आली.
माहितीचे विश्लेषण करून लक्ष्यित कारवाई
गेल्या दहा वर्षांतील शस्त्र गुन्हेगारांची माहिती संकलित करून तिचे विश्लेषण करण्यात आले. त्याआधारे संबंधितांची यादी तयार करून कारवाई करण्यात आली. आरोपींनी शस्त्रे स्वतःकडे न ठेवता मित्र, नातेवाईक किंवा परिचितांच्या ठिकाणी लपवून ठेवली आहेत का, याचीही उपलब्ध माहितीच्या आधारे कायदेशीर प्रक्रियेनुसार तपासणी करण्यात आली.
७ गावठी कट्टे अन् १९ जिवंत काडतुसे जप्त
ऑपरेशनदरम्यान जिल्ह्यात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत ७ गावठी कट्टे, १९ जिवंत राऊंड, १ चाकू, १ तलवार, २५ मोबाइल फोन आणि ३ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ७ लाख १९ हजार ६०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भुसावळमध्ये गावठी कट्टा-काडतुसे
भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी किशोर ऊर्फ गोजऱ्या सकरू जाधव (३१) याच्याकडून एक गावठी कट्टा व दोन जिवंत राऊंड असा ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
वरणगाव पोलिसांच्या कारवाईत एक गावठी कट्टा व एक जिवंत राऊंड जप्त करण्यात आला. त्याची किंमत ३२ हजार रुपये आहे.
एमआयडीसी पोलिसांचीही कारवाई
एमआयडीसी पोलिसांनी रोशन विकास पाटील (२६) याच्याकडून एक गावठी कट्टा जप्त केला. त्याची किंमत ३० हजार रुपये आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत एमआयडीसी पोलिस ठाण्यातील दोन गुन्ह्यांमध्ये राजकिरण मानसिंग परदेशी (२६) आणि रईस रफिक तांबोळी (२१) यांच्याकडून दोन गावठी कट्टे व दोन जिवंत राऊंड जप्त करण्यात आले. या मुद्देमालाची एकूण किंमत ६२ हजार रुपये आहे.
चाळीसगावात दोन कट्टे, काडतुसे अन् चाकू
चाळीसगाव शहर पोलिसांनी प्रथमेश लक्ष्मण भामरे (२०) याच्याकडून दोन गावठी कट्टे, सहा जिवंत राऊंड आणि एक चाकू असा ७२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याच कारवाईत जयेश किरणसिंग राजपूत (२६) याच्याकडून एक तलवार जप्त करण्यात आली.
तर म.पो.का. कलम १२४ अंतर्गत केलेल्या कारवाईत दीपक सुभाष मरसाळे (३०) याच्याकडून २५ मोबाइल फोन आणि तीन मोटारसायकली असा ४ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
‘गुन्हा घडण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाई’
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकारी व अंमलदारांना गुन्हेगारांच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्यास, बेकायदेशीर शस्त्रांचा शोध घेण्यास तसेच गंभीर गुन्हा घडण्यापूर्वीच प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
जळगाव पोलिसांकडून भविष्यातही अशाच प्रकारच्या अचानक, लक्ष्यित आणि माहितीआधारित विशेष मोहिमा राबविण्यात येणार असून, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांच्या विशेष पथकांनी केली.
