ना. गुलाबराव पाटलांनी साहित्यिकांचे ३६ वर्षांचे स्वप्न साकार केले : प्रा. बी. एन. चौधरी
साहित्य कला मंचतर्फे धरणगावात बालकवी जयंती उत्साहात; नवनिर्मित स्मारक साहित्यप्रेमींसाठी प्रेरणास्थान ठरणार
धरणगाव | प्रतिनिधी :
निसर्गकवी बालकवी त्र्यंबक बापूजी ठोमरे यांचे अद्ययावत आणि देखणे स्मारक प्रत्यक्ष साकार करून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी साहित्यिकांचे तब्बल ३६ वर्षांचे स्वप्न साकार केले आहे, असे प्रतिपादन साहित्य कला मंचचे अध्यक्ष प्रा. बी. एन. चौधरी यांनी केले.
बालकवी जयंतीनिमित्त चोपडा रोडवरील नवनिर्मित बालकवी स्मारक परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हे स्मारक पुढील शंभर वर्षे महाराष्ट्रातील बालकवीप्रेमी तसेच नव्या पिढीला सतत प्रेरणा देत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राहुल जैन यांच्या हस्ते बालकवींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुकेश तिवारी यांनी प्रास्ताविक करताना स्मारक उभारणीसाठी साहित्य कला मंचच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमांचा उल्लेख केला. तसेच प्रा. बी. एन. चौधरी आणि डॉ. संजीवकुमार सोनवणे यांच्या स्मारक उभारणीच्या ध्यासाचे कौतुक केले.
सचिव डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी बालकवींच्या कवितांतील सौंदर्यस्थळे उलगडून सांगताना स्मारक निर्मितीच्या प्रवासातील विविध अडथळ्यांचा संदर्भ दिला. कमलेश तिवारी यांनी गावात प्रेक्षणीय वास्तू साकारल्याबद्दल आनंद व्यक्त केला. कडूभाऊ महाजन यांनी या माध्यमातून सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. वासुदेव पाठक यांनी साहित्य कला मंचच्या विविध उपक्रमांना उजाळा दिला, तर भूपेंद्र पाटील यांनी पार्वताबाई ठोमरे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
स्मारकात आर्ट गॅलरी, लायब्ररीसह काव्य उद्यान
नवनिर्मित बालकवी स्मारकात आर्ट गॅलरी, लायब्ररी, सभागृह, बालकवींची प्रतिमा, कार्यालय, कॅन्टीन आणि निवासी कक्ष यांचा समावेश असणार आहे. स्मारकाच्या दर्शनी भागात दोन भव्य व्यासपीठे उभारण्यात येणार आहेत. बाह्य परिसरात गार्डन, ओपन थिएटर, काव्य उद्यान, औदुंबराची झाडे, शोभेची शिल्पे आणि विविध वृक्ष असणार आहेत.
या स्मारकाच्या निर्मितीसाठी विद्यमान पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तसेच माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे पाठबळ लाभल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमास वाय. डी. महाजन, धर्मराज मोरे, सुधाकर विसावे, विवेक लाड, लोकेश चौधरी, निलेश पाठक, भोजराज चौधरी, बारकू महाजन, सखाराम महाजन, दामोदर महाजन, बापू बडगुजर यांच्यासह बालकवीप्रेमी, हेरिटेज वॉक ग्रुप तसेच सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन साहित्य कला मंचचे उपाध्यक्ष डी. एस. पाटील यांनी केले.
