सोनई लिटिल स्टार शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर नृत्य, गायन व महापुरुषांच्या वेशभूषेने रंगला सांस्कृतिक सोहळा
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी : जॉन भालेराव
नामदेवराव लिंबाळे चॅरिटेबल अँड एज्युकेशनल ट्रस्ट संचालित सोनई लिटिल स्टार शाळेत भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण आणि प्रसन्न वातावरणात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत विविध सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या प्राचार्या श्रीमती अरुणा लिंबाळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
महापुरुषांच्या वेशभूषेने वेधले लक्ष
लहान विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा परिधान करून त्यांच्या कार्याची माहिती व विचार दोन शब्दांत मांडले. विद्यार्थ्यांच्या निरागस आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाला उपस्थित पालकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
मोठ्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आधारित आकर्षक नृत्य सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गायन व वादनाचे सादरीकरण करून वातावरण राष्ट्रभक्तीने भारावून टाकले.
प्रवीण जाधव यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उच्च न्यायालयाचे वकील प्रवीण जाधव उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगत शिक्षण, शिस्त, संविधानिक मूल्ये आणि देशाप्रती असलेल्या जबाबदारीबाबत मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक लिंबाळे, करुणा जाधव, आदित्य लिंबाळे, गौरव कांबळे, चबाताई लिंबाळे, प्राचार्या अरुणा लिंबाळे तसेच शिक्षकवृंदाने परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सोनई लिटिल स्टार शाळेतील स्वातंत्र्य दिनाचा सोहळा संस्मरणीय ठरला.
