गोंडगाव नगरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
५१ फुटी तिरंगा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू; लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांची भव्य उपस्थिती
गोंडगाव, ता. भडगाव | प्रतिनिधी : रतिलाल पाटील
गोंडगाव येथे यंदाचा स्वातंत्र्य दिन आगळ्या-वेगळ्या पद्धतीने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील स्मारकासमोर उभारण्यात आलेला ५१ फुटी भव्य तिरंगा ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा तसेच माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात आणि राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषेत छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
सरपंच राहुल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण
गोंडगावचे प्रथम नागरिक तथा सरपंच राहुल पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन व संचालक, शालेय समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशभक्तीचा जयघोष केला. ५१ फुटी तिरंग्याच्या सान्निध्यात झालेल्या या सोहळ्यामुळे गावातील वातावरण आनंदमय आणि राष्ट्रभक्तीने भारावून गेले होते.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
कार्यक्रमादरम्यान गोंडगावातील निवडक गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा सन्मान
गोंडगावचे पोलीस पाटील नुकतेच सेवेतून निवृत्त झाल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच राहुल पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या सेवाकाळातील योगदानाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललित भाऊ मांडोळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्रामसेवक सोमवंशी आप्पा यांनी केले. ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक आणि विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गोंडगावचा स्वातंत्र्य दिन सोहळा संस्मरणीय ठरला.
