माळीवाडा जिल्हा परिषद शाळेच्या प्रश्नांवर मयुर साठे यांचे निवेदन
जीर्ण इमारतीच्या पुनर्बांधणीसह संगणक कक्ष, स्वच्छतागृह व उच्च माध्यमिक वर्ग सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांचे सकारात्मक आश्वासन
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
माळीवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विविध समस्या आणि प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस मयुर साठे यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना नुकतेच निवेदन सादर केले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह शाळेच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली.
माळीवाडा येथील जिल्हा परिषद शाळेची सध्याची इमारत जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवीन शाळेची इमारत उभारण्यात यावी, अशी प्रमुख मागणी मयुर साठे यांनी केली.
संगणक कक्ष व स्वच्छतागृहांची मागणी
शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अद्ययावत संगणक कक्ष सुरू करावा, तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक व स्वच्छ स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
सध्या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी इतरत्र जावे लागू नये, यासाठी इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे उच्च माध्यमिक वर्ग सुरू करण्यात यावेत, तसेच शाळेची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
गावात राहणाऱ्या शिक्षकांची उपलब्धता करण्याची मागणी
शहरातून दररोज ये-जा करणाऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे शक्यतो गावातच वास्तव्यास असलेल्या शिक्षकांची नियुक्ती अथवा उपलब्धता करण्यात यावी आणि दररोज अप-डाऊन करणाऱ्या शिक्षकांच्या प्रश्नावर प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी मयुर साठे यांनी केली.
आगामी निधीतून कामे करण्याचे आश्वासन
निवेदन स्वीकारल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी विविध मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. आगामी निधीतून शाळेची नवीन इमारत उभारणे अथवा आवश्यक दुरुस्तीची कामे करणे, तसेच इतर रास्त मागण्यांवरही लवकरात लवकर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
यावेळी निवेदन सादर करताना युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस मयुर साठे यांच्यासोबत त्यांचे सहकारी विनोद उंटवाल उपस्थित होते.
