पुण्यात मध्यरात्रीपासून १४ दिवस जमावबंदी; पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय
३१ ऑगस्टपर्यंत पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश; विनापरवाना सभा, मोर्चे व निदर्शनांना मनाई
विशेष प्रतिनिधी: हर्षल पाटील
पुणे : पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने महत्त्वाचा प्रतिबंधात्मक निर्णय घेतला आहे. मंगळवार, १८ ऑगस्टच्या मध्यरात्री १२.०१ वाजेपासून ते ३१ ऑगस्टच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
पुढील १४ दिवस हे प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार असून, या कालावधीत शहरातील कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ नये, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) डॉ. प्रशांत अमृतकर यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत. आदेशानुसार संबंधित कालावधीत विनापरवाना व्यक्तींनी एकत्र जमणे, सभा, मोर्चे, निदर्शने अथवा तत्सम कार्यक्रम आयोजित करण्यावर निर्बंध राहणार आहेत.
शहरातील संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, तसेच कोणत्याही प्रकारे शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
पुणेकरांनी या प्रतिबंधात्मक आदेशांची नोंद घेऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे आणि शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम राखावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
