रामदास आठवले, समीर वानखेडे यांच्या उपस्थितीत ‘मैत्रेया’चा ट्रेलर प्रदर्शित!
मैत्री, प्रेम आणि नात्यांचा अनोखा पेच उलगडणार; दिमाखदार सोहळ्यात कलाकारांचे नृत्य आणि गायकांच्या लाइव्ह परफॉर्मन्सने रंगत
मुंबई | प्रतिनिधी – के. रविदादा
काही नाती मैत्रीच्या चौकटीत सहज सामावतात, तर काही नाती नकळत त्या चौकटीच्या पलीकडे जातात. अशा वेळी त्या नात्याला प्रेम म्हणायचे की मैत्री, असा भावनिक पेच निर्माण होतो. याच नात्यांमधील भावनांचा गुंता उलगडणाऱ्या ‘मैत्रेया’ या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला. या सोहळ्याला समीर वानखेडे, सुदेश भोसले, उर्मिला कानेटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.
नृत्य आणि संगीताच्या बहारदार मेजवानीने सोहळा रंगला
या ट्रेलर लाँच सोहळ्याचे खास आकर्षण ठरले ते चित्रपटातील कलाकारांचे धमाकेदार डान्स परफॉर्मन्स. समर, आयुषी, स्काय आणि रूची यांनी आपल्या नृत्याविष्कारातून उपस्थितांची मने जिंकली. त्याचबरोबर प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, सायली पंकज, शिवम सिंह, अपूर्वा निषाद, राणी कोहिनूर आणि सिद्धांत भोसले यांच्या दमदार लाइव्ह म्युझिक परफॉर्मन्सने कार्यक्रमाची रंगत वाढवली.
चित्रपटातील लोकप्रिय गाण्यांवर उपस्थितांनीही ठेका धरला. संगीत आणि नृत्याच्या या बहारदार मेजवानीनंतर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच टाळ्या आणि शिट्ट्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत करण्यात आले. या सोहळ्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढली आहे.
मैत्री आणि प्रेमाच्या भावनांचा भावनिक प्रवास
चित्रपटातील गाण्यांनाही संगीतप्रेमींची विशेष पसंती मिळत आहे. लेखिका-दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे म्हणाल्या, “मैत्री आणि प्रेम या भावना जितक्या सुंदर आहेत, तितक्याच गुंतागुंतीच्याही आहेत. अनेकदा आपल्या मनात नेमके काय आहे, हे आपल्यालाच समजत नाही. जय, साजिरी, आर्जोयी आणि निर्वाण यांच्या नात्यांमधून याच भावनांचे वेगवेगळे पैलू मांडले आहेत. प्रत्येक पात्राचा स्वतःचा भावनिक प्रवास आहे. या चौघांच्या गोष्टीत प्रेक्षकांना कुठेतरी स्वतःचे प्रतिबिंब नक्कीच दिसेल.”
संगीतातून उलगडणार नात्यांचे विविध रंग
संगीतकार पंकज पडघण म्हणाले, “‘मैत्रेया’मधील गाणी ही केवळ चित्रपटाचा भाग नसून, त्यातील पात्रांच्या भावना आणि नात्यांचा प्रवास उलगडणारा महत्त्वाचा दुवा आहेत. प्रत्येक गाण्यातून मैत्री, प्रेम, आनंद आणि भावनांचे वेगवेगळे रंग मांडण्याचा प्रयत्न केला आहे. क्रांती रेडकर यांची गाण्यांमागची संकल्पना समजून घेत ती संगीताच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे साकारता आली. चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद निश्चितच आनंद देणारा आहे.”
तरुणाईसोबतच संपूर्ण कुटुंबासाठी मनोरंजन
निर्माते मनोज खळतकर म्हणाले, “‘मैत्रेया’मधून तरुणाईच्या नात्यांमधील गंमत, सहजपणा आणि भावनिक चढ-उतारांचा अनुभव प्रेक्षकांना घेता येईल. एकीकडे मनोरंजन आणि दुसरीकडे नात्यांशी जोडणाऱ्या भावना, असा समतोल साधण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. तरुणाईसोबतच संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून पाहता येईल असा हा चित्रपट आहे.”
२० नोव्हेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
समर, आयुषी, स्काय आणि रूची यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘मैत्रेया’ या चित्रपटाची निर्मिती समर टाईम्स प्रॉडक्शनने केली आहे. क्रांती रेडकर वानखेडे यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून मनोज खळतकर निर्माते तर अमन खळतकर सहनिर्माते आहेत. येत्या २० नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मैत्री, प्रेम, नात्यांमधील भावनिक गुंतागुंत, संगीत आणि मनोरंजन यांचा संगम असलेल्या ‘मैत्रेया’कडून प्रेक्षकांना आता मोठ्या अपेक्षा आहेत.
