ग्रामपंचायत प्रशासनाची टाळाटाळ; आभोडा बुद्रुकमध्ये ग्रामसभा न झाल्याने युवकांचा आक्रोश
पाणीपुरवठा, स्वच्छता व स्थानिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विशेष ग्रामसभेची मागणी; पंचायत समिती रावेर येथे विस्तार अधिकाऱ्यांना निवेदन
रावेर | प्रतिनिधी : प्रदीप खैरे : आभोडा बुद्रुक येथे नियोजित ग्रामसभा न झाल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभाराविरोधात स्थानिक युवक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. १८ ऑगस्ट २०२६ रोजी राष्ट्रीय युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी रावेर पंचायत समिती कार्यालय गाठत प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा निषेध केला. यावेळी विस्तार अधिकारी शिंदे यांना निवेदन देऊन ग्रामसभा न घेण्याच्या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, आभोडा बुद्रुक येथील महिलांनी पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच विविध स्थानिक सामाजिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात यावी, अशी मागणी केली होती. यासाठी ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडे १४ ऑगस्ट २०२६ रोजी लेखी अर्ज देण्यात आला होता.
मात्र, अर्ज देऊनही ग्रामसभा घेण्याबाबत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामसभा का झाली नाही किंवा पुढील ग्रामसभा कधी घेण्यात येणार, याबाबतही ग्रामपंचायतीकडून कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
युवकांनी गाठले पंचायत समिती कार्यालय
ग्रामसभा न घेतल्याने संतप्त झालेल्या युवक आणि ग्रामस्थांनी राष्ट्रीय युवा समितीच्या नेतृत्वाखाली रावेर पंचायत समिती कार्यालय गाठले. ग्रामपंचायत प्रशासनाच्या कथित निष्काळजीपणाबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
पंचायत समिती कार्यालयात गट विकास अधिकारी उपस्थित नसल्याने शिष्टमंडळाने विस्तार अधिकारी शिंदे यांची भेट घेतली. यावेळी संपूर्ण प्रकरणाची माहिती देऊन मागण्यांचे निवेदन त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
संबंधितांवर कारवाईची मागणी
ग्रामसभा वेळेत न घेणे आणि ग्रामस्थांच्या अर्जाची दखल न घेणे या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, तसेच ग्रामस्थांच्या प्रश्नांवर ग्रामसभेच्या माध्यमातून चर्चा घडवून आणावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रीय युवा समितीचे अध्यक्ष तथा आसोमं तालुका अध्यक्ष सॅम तडवी, राष्ट्रीय युवा समितीचे कार्याध्यक्ष तथा भाजप कार्यकर्ते सचिन चव्हाण, कोषाध्यक्ष गजेंद्र पवार, ग्रामपंचायत मोबिलायझर लुकमान तडवी यांच्यासह राष्ट्रीय युवा समितीचे कार्यकारी मंडळ आणि आभोडा बुद्रुक येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आता पंचायत समिती प्रशासन या निवेदनाची कितपत दखल घेते आणि आभोडा बुद्रुक येथील ग्रामसभेबाबत पुढील निर्णय काय घेतला जातो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
