युवतींनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी परिश्रम घ्यावेत : हेमलताताई इंगळे
युवती सभेच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या सुप्त कलागुणांना व नेतृत्वगुणांना मिळणार चालना
भुसावळ | प्रतिनिधी संघरत्न सपकाळे : “महाविद्यालयीन जीवनातील युवती सभेचे व्यासपीठ हे विद्यार्थिनींच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे तसेच व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारे महत्त्वाचे माध्यम आहे. युवतींनी उज्ज्वल भविष्यासाठी मोठी स्वप्ने डोळ्यासमोर ठेवून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी,” असे प्रतिपादन सेकंडरी एज्युकेशन सोसायटी, भालोदच्या चेअरमन सौ. हेमलताताई मुरलीधर इंगळे यांनी केले.
येथील कला व विज्ञान महाविद्यालयातील युवती सभेच्या उद्घाटन समारंभात त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. कोल्हे होते.
‘पाच स्व’चा अंगीकार करून जीवन विकसित करा
यावेळी बोलताना हेमलताताई इंगळे म्हणाल्या की, स्वराष्ट्र, स्वधर्म, स्वसंस्कृती, स्वभाषा आणि स्वाभिमान या पाच ‘स्व’चा अंगीकार करून विद्यार्थिनींनी आपले जीवन घडवावे. शिक्षणाच्या माध्यमातून आदर्श नागरिक म्हणून समाजात आपले स्थान निर्माण करावे. चांगले विचार आणि चांगले संस्कार हे व्यक्तीला आनंदी व समृद्ध जीवन देतात, असेही त्यांनी सांगितले.
युवती सभेतून सर्वांगीण विकासाला चालना
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. के. जी. कोल्हे यांनी युवती सभेचे महत्त्व अधोरेखित केले. युवती सभेच्या माध्यमातून विद्यार्थिनींना परस्परांच्या विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळते. तसेच स्वाभिमानासोबतच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. विद्यार्थिनींनी या व्यासपीठाच्या माध्यमातून नेतृत्वगुण विकसित करून जीवनातील विविध आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जावे, असे आवाहन त्यांनी केले.
आगामी उपक्रमांची माहिती
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवती सभाप्रमुख प्रा. डॉ. मीनाक्षी वाघुळदे यांनी केले. त्यांनी युवती सभेची उद्दिष्टे तसेच आगामी उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थिनींनी या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कु. हेमांगी इंगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. कु. हेमांगी महाजन यांनी केले.
यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. आशुतोष वर्डीकर, युवती सभा समिती सदस्या प्रा. सौ. मोहिनी तायडे, प्रा. सौ. गीतांजली चौधरी, प्रा. सौ. भावना प्रजापती, प्रा. जान्हवी परतणे, प्रा. फाल्गुनी राणे, प्रा. मानसी महाजन, प्रा. सौ. हंशाली महाजन यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
