गंभीर गैरव्यवहार, वाढता रोहित्र बिघाड, कोट्यवधींची थकबाकी आणि वीजचोरीच्या प्रकरणांकडे दुर्लक्ष; १९ ऑगस्टपासून निलंबनाची कारवाई
जळगाव | प्रतिनिधी : महावितरणच्या जळगाव मंडल कार्यालयात मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली असून, अधीक्षक अभियंता विनोद चंद्रकांत पाटील यांना तत्काळ प्रभावाने सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक तथा सक्षम अधिकारी दिलीप ज्ञा. जगदाळे यांनी १९ ऑगस्ट २०२६ रोजी निलंबनाचे आदेश काढले. गंभीर प्रशासकीय त्रुटी, महसुली नुकसान तसेच विविध प्रकरणांमध्ये अपेक्षित कार्यवाही न झाल्याचे तपासात निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे.
चोपडा उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मर बिघाडाने प्रश्नचिन्ह
चोपडा शहरी उपकेंद्रातील १० एमव्हीए पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये गंभीर अंतर्गत बिघाड आढळल्याचे तपासात निष्पन्न झाले. चाचणीदरम्यान बुकोज रिलेमधून ज्वलनशील वायू बाहेर पडल्याचे तसेच शॉर्ट सर्किट चाचणीचे निष्कर्ष असमाधानकारक असल्याचे समोर आले. या गंभीर तांत्रिक बाबींकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले गेले नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
रोहित्र नादुरुस्तीचे प्रमाण नियमांच्या पलीकडे
महावितरणच्या नियमानुसार रोहित्र नादुरुस्तीचे प्रमाण ३.८१ टक्क्यांपर्यंत असणे अपेक्षित आहे. मात्र जळगाव मंडलात सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या कालावधीत हे प्रमाण तब्बल १०.२६ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे निदर्शनास आले. अपेक्षित मर्यादेपेक्षा मोठ्या प्रमाणात नादुरुस्ती होत असतानाही त्यावर प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
९४ हजारांहून अधिक ग्राहकांकडे कोट्यवधींची थकबाकी
महावितरणच्या महसुली वसुलीच्या बाबतीतही गंभीर चित्र समोर आले आहे. मागील तीन महिन्यांपासून वीजबिल न भरलेल्या ९४,६२१ ग्राहकांकडे ३,६२९.९६ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर जुलै २०२६ अखेर एकूण ६,७१४.७९ लाख रुपयांची थकबाकी वसूल न झाल्याने कंपनीच्या महसुलावर मोठा परिणाम झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
वीजचोरीच्या ३१६४ प्रकरणांपैकी २१६९ प्रकरणांवर कारवाई नाही
वीजचोरीविरोधातील कारवाईबाबतही निलंबन आदेशात गंभीर निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. कार्यक्षेत्रात कलम १३५ अंतर्गत वीजचोरीची ३,१६४ प्रकरणे आढळून आली. त्यापैकी तब्बल २,१६९ प्रकरणांमध्ये पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वीजचोरीसारख्या गंभीर बाबींमध्ये अपेक्षित कार्यवाही न झाल्याबाबतही जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
निलंबन काळात आठवड्यातून दोनदा हजेरी
निलंबनाच्या कालावधीत विनोद पाटील यांना मुख्य अभियंता, नाशिक परिमंडळ, नाशिक यांच्या कार्यालयात दर सोमवार आणि शुक्रवारी सकाळी १० वाजता हजेरी नोंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय निलंबन काळात मुख्यालय सोडण्यासही मनाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे महावितरणच्या जळगाव मंडलातील प्रशासकीय कामकाजात खळबळ उडाली असून, महसुली वसुली, रोहित्र नादुरुस्ती आणि वीजचोरीविरोधातील कारवाईबाबत प्रशासनाची भूमिका आता अधिक कठोर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
