‘परी’ येथील रेशन दुकानाचा सावळागोंधळ; तक्रार करून महिना उलटला तरी पुरवठा विभाग सुस्त!
दुकानदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संतप्त लाभार्थ्यांचा सवाल: ‘पुरवठा विभाग झोपलाय की झोपेचे सोंग घेतलेय?’
शहादा प्रतिनिधी : शासनाकडून गोरगरीब, गरजू जनतेसाठी सुरू करण्यात आलेल्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेला शहादा तालुक्यातील परी येथे रेशन दुकानदाराकडून हरताळ फासला जात असल्याचे समोर आले आहे. लाभार्थ्यांना नियमानुसार धान्याचे वाटप न करणे,अंत्योदय योजनेच्या धान्यात परस्पर कपात करणे आणि हक्काची साखर गायब करणे असा गंभीर प्रकार येथे सुरू आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी अधिकृत तक्रार देऊन महिना उलटून गेला तरी पुरवठा विभागाकडून कोणतीही ठोस चौकशी झालेली नाही. त्यामुळे शहादा पुरवठा विभाग नेमका कुणाच्या दबावाखाली काम करतोय, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
शासनाच्या नियमानुसार प्रत्येक युनिटनुसार योग्य ते धान्य मिळणे आवश्यक असताना लाभार्थ्यांच्या पदरात कमी धान्य पाडले जात आहे.
अंत्योदय कार्डधारकांना दरमहा ३५ किलो शिधा देणे बंधनकारक असताना त्यांनाही पुरेसे धान्य दिले जात नाही. लाभार्थ्यांना मिळणारी एक किलो साखर सर्रासपणे गायब केली जात असल्याचा थेट आरोप नागरिकांनी केला आहे. पारदर्शकता राखण्यासाठी दुकानाबाहेर धान्याचा साठा, दर आणि उपलब्धतेचे फलक लावणे बंधनकारक असताना येथे असे कोणतेही फलक लावलेले नाहीत.
गावातील दक्षता समितीची नियमित बैठक घेऊन वितरण व्यवस्थेवर देखरेख ठेवणे गरजेचे असताना, येथे कोणतीही बैठक घेतली जात नाही. परी येथील रेशन दुकानातील गैरव्यवहाराबाबत ग्रामस्थांनी लेखी तक्रार नोंदवून एक महिना उलटला आहे. मात्र, अद्याप पुरवठा विभागाच्या एकाही जबाबदार अधिकाऱ्याने गावात जाऊन प्रत्यक्ष पंचनामा किंवा चौकशी केलेली नाही. सर्व नियम धाब्यावर बसवले जात असतानाही पुरवठा विभाग ‘सर्व काही अलबेल’ असल्याचा आव आणत आहे. यावरून संबंधित दुकानदाराला वाचवण्याचाच प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे का,अशी तीव्र शंका उपस्थित होत आहे. गोरगरिबांच्या हक्काच्या अन्नावर डल्ला मारणाऱ्या अशा रेशन दुकानदारावर तात्काळ कठोर कारवाई करून त्याचा परवाना रद्द करावा,अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.
