सुप्रीम कॉलनीत किरकोळ वादातून दगडफेक; पोलिसांचा तातडीने बंदोबस्त
वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गट आमनेसामने; आरसीपी पथकासह एमआयडीसी पोलिसांची धाव
जळगाव | प्रतिनिधी : जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात किराणा दुकानासमोर वाळू टाकण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद होऊन दगडफेक झाल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रीम कॉलनीतील एका किराणा दुकानासमोर वाळू टाकण्यात आल्यावरून दुकान मालकाच्या मुलाचा एका व्यक्तीसोबत वाद झाला. त्यानंतर काही तरुण एकत्र येऊन समोरील गल्लीत दगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या गटातील काही व्यक्तींनीही दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती आहे.
पोलिसांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांचे पथक तसेच एसडीपीओंचे आरसीपी पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने जमाव पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास
दरम्यान, पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य उपलब्ध माहितीची पडताळणी सुरू आहे. दगडफेकीत नेमके कोण सहभागी होते, याचा तपास करण्यात येत असून, चौकशीनंतर संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
परिस्थिती नियंत्रणात; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
सध्या सुप्रीम कॉलनी परिसरातील परिस्थिती नियंत्रणात असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा अफवा पसरवू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. परिसरातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.
