धुळे NHM कंत्राटी पदभरतीवरील स्थगिती उठवण्यासाठी युवासेना आक्रमक
सुशिक्षित बेरोजगारांच्या भवितव्याचा प्रश्न; आरोग्यमंत्र्यांकडे प्रलंबित भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी
धुळे | प्रतिनिधी : धुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णसेवेवर मोठा परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत सुरू असलेल्या कंत्राटी पदभरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आल्याने शेकडो सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही स्थगिती तातडीने उठवून भरती प्रक्रिया पूर्ववत करण्यासाठी युवासेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन साद केले. युवकांच्या हक्कासाठी आणि प्रलंबित भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
३० जूनचा स्थगिती आदेश रद्द करण्याची मागणी
युवासेनेने ३० जून २०२६ रोजीचा स्थगिती आदेश तातडीने रद्द करावा, अशी प्रमुख मागणी केली. तसेच धुळे जिल्ह्यातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर तांत्रिक पदांची प्रलंबित भरती प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेत मनुष्यबळाची कमतरता असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रिक्त पदे भरून आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रशिक्षित व पात्र युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे युवासेनेने नमूद केले.
मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद
हे निवेदन युवासेना जिल्हाप्रमुख योगेश मराठे यांनी आरोग्यमंत्र्यांकडे सुपूर्द केले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मनोज कोळेकर उपस्थित होते.
युवकांच्या या प्रश्नावर मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे युवासेनेकडून सांगण्यात आले. NHM भरतीवरील स्थगिती उठवून युवकांना न्याय मिळेपर्यंत युवासेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असल्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
