विद्यापीठस्तरीय ‘उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी सेवा गौरव’ पुरस्काराने संजय तोडे सन्मानित
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे गौरव; मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
धरणगाव | प्रतिनिधी – वाल्मिक पाटील
धरणगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी संजय भीमराव तोडे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्यातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या *‘उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी सेवा गौरव पुरस्कार-२०२५’*ने सन्मानित करण्यात आले.
विद्यापीठात आयोजित कार्यगौरव सोहळ्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते संजय तोडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. सोपान इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, व्यवस्थापन समिती सदस्य प्रा. डी. आर. पाटील, डॉ. राजेंद्र नन्नवरे, डॉ. कांचन महाजन यांच्यासह विद्यापीठातील विविध अधिकारी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
संजय तोडे यांनी महाविद्यालयातील आपल्या सेवाकाळात प्रशासकीय कामकाज, विद्यार्थी व महाविद्यालयीन व्यवस्थापनाशी संबंधित विविध जबाबदाऱ्या कार्यक्षमतेने पार पाडल्या. त्यांच्या सेवाभावी वृत्तीची, कामातील तत्परतेची आणि जबाबदारीने केलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना विद्यापीठस्तरीय हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सन्मानाबद्दल महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संजय तोडे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या यशामुळे धरणगाव परिसरातूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
