गरिबीमुळे शिक्षण थांबू नये; माजी विद्यार्थिनीच्या स्मृतिप्रीत्यर्थ शाळेला पाठ्यपुस्तकांची भेट
नारखेडे कुटुंबीयांकडून नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचे संच; माजी मुख्याध्यापकांकडून वह्यांचे वाटप
भुसावळ | प्रतिनिधी :
नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे माजी विद्यार्थिनी स्वर्गीय मंजुषा सुधाकर नारखेडे (पूर्वाश्रमीच्या रेखा भंगाळे) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कुटुंबीयांकडून विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकांचे संच भेट देण्यात आले. गरिबीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती आणि शिक्षणासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सुधाकर नारखेडे यांनी इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पाठ्यपुस्तकांचे प्रत्येकी पाच संच शाळेला भेट दिले. या पाठ्यपुस्तकांचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना करण्यात आले.
यावेळी शालेय समितीचे चेअरमन राजेंद्र आवटे, नगरसेविका सीमा नरवाडे, मुख्याध्यापक व्ही. पी. सुलताने, माजी मुख्याध्यापक बी. वाय. सोनवणे, शिक्षिका सरला सावकारे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त वह्यांचे वाटप
याच कार्यक्रमात शाळेचे माजी मुख्याध्यापक बी. वाय. सोनवणे यांनी त्यांचा मुलगा स्वर्गीय गौरव सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. शिक्षणाच्या क्षेत्रात गरजू विद्यार्थ्यांना मदत करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली.
शैक्षणिक साहित्याच्या अभावामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे उपस्थितांनी सांगितले. गरजू विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, वह्या आणि अन्य शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणाऱ्या नारखेडे व सोनवणे कुटुंबीयांच्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
“आर्थिक परिस्थितीमुळे एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये. समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेतल्यास अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यास मदत होईल,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन एस. टी. चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिष्यवृत्ती विभागासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
