यशस्वी होण्यासाठी चुकीचा मार्ग निवडू नका; वकिलांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रसन्ना वराळे यांचा सल्ला
शिरपूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे लोकार्पण; ‘सर्वसामान्यांसाठी सर्वसमावेशक न्यायव्यवस्था उभी करा’चे आवाहन
शिरपूर, धुळे | प्रतिनिधी :
“वकील बांधवांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी कधीही चुकीचा मार्ग निवडू नये. चुकीच्या मार्गाचा अवलंब केल्यास भविष्यात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. सर्वसामान्य नागरिकांना सहज आणि न्याय्य पद्धतीने न्याय मिळेल, अशी सर्वसमावेशक न्यायव्यवस्था उभी करण्यासाठी प्रयत्न करा,” असा महत्त्वपूर्ण सल्ला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रसन्ना वराळे यांनी वकिलांना दिला.
शिरपूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिरपूर न्यायालयाच्या ठिकाणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू होत असल्याने हा अत्यंत गौरवाचा आणि ऐतिहासिक क्षण असल्याचेही त्यांनी नमूद केले.

३३ वर्षांच्या पाठपुराव्याला यश
शिरपूर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू करण्यासाठी येथील वकील बांधव गेल्या ३३ वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत होते. अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून न्यायाधीश प्रसन्ना वराळे यांच्या हस्ते न्यायालयाचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी न्यायाधीश वराळे यांनी न्यायालयाच्या इमारतीची पाहणी केली. तसेच या मागणीसाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या शिरपूर तालुका वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांचे आणि वकिलांचे कौतुक केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन भूमीत न्यायालय
शिरपूर न्यायालयाची स्थापना १९६८ मध्ये झाली होती. विशेष म्हणजे, १९३५ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका खटल्याच्या कामानिमित्त शिरपूर न्यायालयात आले होते, अशी माहिती यावेळी देण्यात आली. त्यामुळे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या न्यायालयाला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा दर्जा मिळणे ही शिरपूरसाठी अभिमानाची बाब असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
नवीन न्यायालयामुळे शिरपूर परिसरातील अनेक प्रकरणांचा स्थानिक पातळीवरच निपटारा होण्यास मदत होणार असून, नागरिकांना न्यायासाठी दूरवर जाण्याची गरज कमी होणार आहे.
न्यायव्यवस्थेसोबत आरोग्य व्यवस्थेवरही मार्गदर्शन
न्यायाधीश प्रसन्ना वराळे यांनी यावेळी न्यायव्यवस्थेच्या विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन केले. सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून न्यायव्यवस्था अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच आरोग्य व्यवस्थेसह विविध सामाजिक विषयांवरही त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रसन्ना वराळे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सारंग कोतवाल, नितीन सूर्यवंशी, संजय देशमुख, किशोर संत, अभय वाघवसे, संतोष चपळगावकर, वैशाली पाटील, शैलेश ब्रह्मे, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अजित कडेठाणकर, धुळे जिल्हा न्यायालयाच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भीष्म, शिरपूर तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शांताराम महाजन, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. ज्ञानेश्वर बागुल, ॲड. प्रदीप शिरसाट यांच्यासह न्यायव्यवस्था, वकील संघटना आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
