पत्रकार सुशील थोरात हल्ला प्रकरणाचा जामखेडमध्ये तीव्र निषेध; प्रशासनाला निवेदन
हल्लेखोरांना तातडीने अटक करून पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाईची मागणी
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी | बापुसाहेब घोडेस्वार
जामखेड : ‘साम’ वृत्तवाहिनीचे अहिल्यानगर येथील प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार सुशील थोरात यांच्यावर गुरुवारी (दि. २० ऑगस्ट) झालेल्या हल्ल्याचा जामखेड तालुक्यातील पत्रकारांनी तीव्र निषेध केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या थोरात यांना न्याय मिळावा, तसेच हल्लेखोरांना तातडीने अटक करून पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी जामखेड पत्रकार संघाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
जामखेड तहसीलदार कार्यालयातील पुरवठा अधिकारी जालिंदर कदम तसेच जामखेड पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक वर्षा जाधव यांना पत्रकारांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले. पत्रकारांवर होणारे हल्ले कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत, अशी ठाम भूमिका यावेळी पत्रकारांनी व्यक्त केली.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, समाजातील विविध प्रश्न प्रशासन आणि जनतेसमोर मांडण्याचे महत्त्वाचे कार्य पत्रकार करतात. त्यामुळे पत्रकारांवर हल्ले होणे ही लोकशाहीसाठी गंभीर बाब आहे. भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासन व पोलिसांनी कठोर आणि ठोस पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
‘पत्रकारांना निर्भय वातावरण मिळावे’
पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण म्हणाले, “पत्रकार सुशील थोरात यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत गंभीर आहे. पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत हल्लेखोर आरोपींवर कठोर कारवाई करून पत्रकारांना सुरक्षित वातावरण मिळेल, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने द्यावा.”
जामखेड मीडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट यांनीही हल्ल्याचा तीव्र निषेध करत, “पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. पत्रकार निर्भयपणे काम करू शकतील, यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलावीत,” अशी मागणी केली.
संजय वारभोग यांनी पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेण्याची गरज व्यक्त केली. “पत्रकारांवर हल्ला करण्याचे धाडस पुन्हा कोणी करणार नाही, अशी कठोर कारवाई आरोपींवर झाली पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.
किरण रेडे म्हणाले, “पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. समाजातील प्रश्न प्रशासन आणि जनतेसमोर मांडण्याचे काम पत्रकार करतात. अशा पत्रकारावरच हल्ला होत असेल तर ही गंभीर बाब आहे. त्यामुळे हल्लेखोरांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.”
पत्रकारांची एकमुखी मागणी
सुशील थोरात यांच्यावरील हल्ल्याची सखोल चौकशी करून सर्व संबंधित आरोपींना तातडीने ताब्यात घ्यावे आणि पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी जामखेड तालुक्यातील पत्रकारांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण, जामखेड मीडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, ज्येष्ठ पत्रकार अशोक निमोणकर, संजय वारभोग, पप्पू सय्यद, किरण रेडे, अजय अवसरे, अविनाश बोधले, निलेश वनारसे, नासीर चाचू, मयुर भोसले यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पत्रकारांच्या प्रमुख मागण्या
सुशील थोरात यांच्यावरील हल्ल्याची सखोल चौकशी करावी.
सर्व संबंधित आरोपींना तातडीने अटक करावी.
पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करावी.
पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात.
